गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातून भाजपाचे अशोक नेते ७७ हजार ५२६ मतांनी विजयी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातून भाजपाचे उमेदवार अशोक नेते हे ७७ हजार ५२६ क मतांनी विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी काॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. नामदेव उसेंडी यांचा त्यांनी पराभव केला आहे. मतदानाच्या प्रक्रियेनंतर भाजपा आणि काॅंग्रेसमध्ये काट्याची टक्कर होणार हे निश्चित होते. २०१४ च्या निवडणूकीत अशोक नेते यांचा प्रचंड मताधिक्क्याने विजय झाला होता. मात्र यावर्षीच्या निवडणूकीत डाॅ. उसेंडी यांनी नेते यांना चांगलीच टक्कर दिली आहे.
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात १५ लाख ८० हजार ७० मतदारांपैकी ११ लाख ३७ हजार २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पोस्टल मतदानासह ११ लाख ४२ हजार ६९८ मतदारांनी मतदान केले.  काल २३ मे रोजी पार पडलेल्या मतमोजणीत सुरूवातीपासूनच अशोक नेते आघाडीवर होते. अशोक नेते यांना ५  लाख १९ हजार ९६८ मते मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार डाॅ. नामदेव उसेंडी यांना ४  लाख ४२ हजार ४४२ मते मिळाली आहेत. त्यापाठोपाठ वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार डाॅ. रमेशकुमार गजबे यांना १ लाख १० हजार ७३६ मते मिळाली आहेत. बहूजन समाज पार्टीचे उमेदवार हरीश्चंद्र मंगाम यांना २८ हजार ६ तर देवराव नन्नावरे यांना १६ हजार ९० मते मिळाली आहेत. लोकसभा क्षेत्रात मागील निवडणूकीप्रमाणे या निवडणूकीतही २४ हजार ५९९ मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. देशातील सर्व मतदारसंघांपैकी या लोकसभा क्षेत्रातील नोटाला झालेले हे सर्वाधिक मतदान असण्याची शक्यता आहे. 
अशोक नेते यांच्या विजयामुळे भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड जल्लोष केला आहे. गुलाल उधळले जात आहे. फटाके फोडून आनंद व्यक्त केला जात आहे. सोशल मिडीयावरूनही अशोक नेते यांचे अभिनंदन केले जात आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-24


Related Photos