काँग्रेससह सर्व विरोधकांना धूळ चारत सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  'चौकीदार चोर है' म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार केलेली टीका, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत यासाठी तब्बल २४ हुन अधिक विरोधी नेत्यांनी चालवलेली धडपड मतदारांनी सपशेल फेल ठरली आहे.   मोदींनी काँग्रेससह सर्व विरोधकांना धूळ चारत सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिले. पूर्ण बहुमतासह सत्तेवर परतणारे मोदी तिसरे आणि पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत. 
यापूर्वी  जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी असे यश मिळविले होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झालेले निकाल आणि कल यांच्यावरून भाजपच्या ३०० सह एनडीए ३५० च्या आसपास जागा जिंकेल हे स्पष्ट झाले आहे.   महाराष्ट्रात काँग्रेसने केवळ एक जागा जिंकली आहे. 
लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागी झालेल्या मतदानाची मोजणी शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आणि सुरुवातीचे कल हाती येताच ६८ वर्षीय नरेंद्र मोदी सन २०१४ च्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा पंतप्रधान बनणार हे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, एग्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा कितीतरी भरीव कामगिरी भाजपप्रणित एनडीएने केली असून, अनेक वर्षांनंतर एग्झिट पोलचे अंदाजही खरे ठरले आहेत. काँग्रेस आणि मित्रपक्षांना शंभरी गाठणेही अशक्य होऊन त्यांची घोडदौड नव्वदीपर्यंतच आटोपेल, असे रात्री उशिरापर्यंतचे कौल सांगत होते.  
मोदींविरोधात जबरदस्त आघाडी उघडणाऱ्या ममता बॅनर्जी यांना तर भाजपने त्यांच्या बालेकिल्ल्यातच धक्का दिला.  २०१४ मध्ये पश्चिम बंगालमध्ये फक्त दोन जागा जिंकणाऱ्या भाजपने राज्यात ४२ पैकी १९ जागांवर मुसंडी मारली असून, तृणमूल काँग्रेसला २३ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. एकेकाळी राज्यात अनभिषिक्त सत्ता भोगणाऱ्या डाव्यांना तर भोपळाही फोडता आला नसून, त्यांचे अस्तित्वच संपले आहे. ओडिशातही मुसंडी मारत भाजपने २१पैकी सहा जागी आघाडी घेतली असून, सत्ताधारी बिजू जनता दलास १५ जागा मिळणार आहेत. सन २०१४मध्ये भाजपकडे फक्त एक जागा होती.   Print


News - World | Posted : 2019-05-24


Related Photos