महत्वाच्या बातम्या

 बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- जिल्ह्यात अनुदानावर १४२ बीबीएफ यंत्राचे वाटप

- २६ हजार शेतकऱ्यांची बीबीएफद्वारे सोयाबीन पेरणी

- सोयाबिनचे १६ हजार हेक्टर क्षेत्र बीबीएफखाली

- रब्बीत हरभऱ्याचे या तंत्राद्वारे पेरणीचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे लागवड केल्यास अधिकचा पाऊस किंवा पावसात खंड पडल्यास पिकांचे नुकसान होत नाही. उत्पन्न वाढीसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. यावर्षी खरीप हंगामात २६  हजार शेतकऱ्यांनी १६ हजार हेक्टरवर या पध्दतीने सोयाबीनची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी या फायदेशीर पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

खरीप हंगामात पावसाचा दीर्घकालीन खंड किंवा अधिकच्या पावसामुळे साचून राहणारे पाणी यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अशावेळी पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, पीक वाढीसाठी अनुकूल गादी वाफे, बीबीएफ तयार करणे आणि त्यावर पिकांची लागवड करणे फायदेशीर ठरते. बीबीएफमुळे पिकांची चांगली उगवण होते. कमी किंवा अधिक पावसाच्या परिस्थितीमध्ये हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची बीबीएफद्वारे लागवड करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यात जुलै व ऑगस्टच्या दरम्यान पावसाने ओढ दिल्यामुळे पारंपारिक पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीनपेक्षा बीबीएफच्या सोयाबीन पिकाची वाढ चांगली झाल्याचे दिसून आले. वरंब्यामध्ये पावसाचे पाणी मुरल्यामुळे व ओल टिकून राहिल्याने सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाली. जिल्ह्यात २६ हजार १२४ शेतकऱ्यांनी १६ हजार १०२ हेक्टरवर बीबीएफद्वारे सोयाबीनची लागवड केली आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी बीबीएफचे क्षेत्र १४ हजार ६७ हेक्टरने वाढले आहे.

नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) स्वयंसहायता समूहांना ३८ बीबीएफ यंत्राचे अनुदानावर वाटप केले. त्याद्वारे ६ हजार १३० महिला शेतकऱ्यांनी ४ हजार ९०४ हेक्टर क्षेत्रावर बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची लागवड केल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी बीबीएफच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. आत्मा अंतर्गत २९, उमेदच्या महिला बचत गटांना नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ३८ व पोकरा योजनेंतर्गत ७५ बीबीएफ यंत्र अनुदानावर वाटप करण्यात आले आहे.

बीबीएफद्वारे पिकांच्या लागवडीचे फायदे -

बियांसाठी चांगले वरंबे तयार होतात. वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी आणि हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. बियाण्यांची उगवण चांगली होते. पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते, त्यामुळे मुलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास, विशेषत: पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात लाभ होतो. अधिकचे पाणी निचरा होण्यास मदत होते. २० टक्के बियाणे व खताची बचत होते. चार कामे एकाच वेळी करता येतात जसे की, रुंद वरंबे दोन्ही बाजूंनी सऱ्यांसह बनविणे, खत व बियाणे पेरणी, रासणी करणे, उगवणपूर्व तणनाशक फवारणीमुळे मजूर, वेळ आणि इंधनाची बचत होते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत सरासरी २० ते २५ टक्क्यांपर्यंत अधिक जलसंधारण होऊन २० ते २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात वाढ साध्य होऊ शकते.





  Print






News - Wardha




Related Photos