महत्वाच्या बातम्या

 गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन सामूहिकरीत्या करणे लाभदायक : डॉ. चारुदत्त मायी


- बोपापूर येथे बोंडअळी व्यवस्थापन प्रशिक्षण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : यावर्षी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव लवकर दिसून आला आहे. भारतामध्ये ज्या ठिकाणी कापूस पिकविल्या जातो अशा ठिकाणी पीबी नॉट तंत्रज्ञानाचे प्रयोग घेण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामध्ये कापसावरील गुलाबी बोंडअळीला रोखण्याचे सामर्थ्य आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करत बोंडअळीचे सामुहिकपणे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन साउथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटरचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र, साउथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटर जोधपुर, ऍग्रो व्हिजन फाऊंडेशन नागपूर व पीआय फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट बंधन व कापूस एकात्मिक व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत देवळी तालुक्यातील बोपापूर येथे कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी पीबी नॉट नवीन तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ.मायी यांच्यासह भारत सहकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या कृषि उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे सदस्य डॉ. भगीरथ चौधरी, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. जीवन कतोरे, किटकशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. निलेश वझीरे, पोलिस पाटील सचिन वडतकर यांच्यासह बोपापूर (दिघी), सोनेगाव, अडेगाव, चिखली येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कापूस पिकावर फवारणीसाठी होणारा खर्च पीबी नॉट या तंत्रज्ञानामुळे कमी करता येईल तसेच उत्पादन वाढीमध्ये नक्कीच या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असे डॉ. मायी यांनी सांगितले. कापसाच्या झाडाला पीबी नॉट कसे बांधायचे याचे त्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी डॉ.मायी यांच्या मार्गदर्शनानुसार माधुरी सचिन वडतकर यांनी कपाशीच्या झाडाला पीबी नॉट बांधून रक्षाबंधन साजरे केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. जीवन कतोरे यांनी केले. पीबी नॉट हे नवीन तंत्रज्ञान आहे. त्यासाठी बोपापूर या गावाची निवड करून ऐकून ६० एकर क्षेत्रावर हा प्रयोग घेण्यात येणार आहे. या तंत्रज्ञान शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असे ते म्हणाले. डॉ. भगीरथ चौधरी यांनी पीबी नॉट तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अंगीकार करण्यासोबतच कामगंध सापळ्याचे महत्व व त्याचे होणारे फायदे याबद्दल माहिती दिली. डॉ. निलेश वझीरे यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. निलेश वझीरे यांनी केले तसेच आभार सचिन वडतकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रुपेश झाडोदे, गजानन म्हसाळ, मनुश्री पाटील, शुभम पेंद्राम यांनी सहकार्य केले.





  Print






News - Wardha




Related Photos