महत्वाच्या बातम्या

 अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा होणार पुरवठा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ८ मार्च २०१७ च्या शासन निर्णयान्वये, अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे या योजनेत आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत ज्या लाभार्थी बचतगटाला देण्यात येणारे अर्थसहाय्य वस्तु स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्य हे रुपये ३.१५ लाख बचतगटाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती : स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनु.जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनु.जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. राष्ट्रीयकृत बँकेत बचतगटाच्या नावे बँक खाते असावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असावे. स्वयंसहाय्यता बचत गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, सहकार आणि शेतकरी कल्याण यांनी निर्धारीत केल्यानुसार फार्म, मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टींग इन्स्टीट्युट यांनी टेस्ट करुन जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिणामानुसार असावेत.

पात्र स्वयंसहायता बचत गटांना शासनाने त्या-त्या जिल्ह्यासाठी निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टांनुसार अर्थसहाय्य मंजूर करून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या स्वयंसहायता बचतगटाला त्यांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे, अधिकृत संस्थांकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. स्वयंसहायता बचतगटाने खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व उपसाधने अर्थसहाय्य घेतल्यानंतर सदर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने विकत घेता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. तसे आशयाचे हमीपत्र स्वयंसहायता बचत गटाला द्यावे लागेल. तसेच पुढे प्रत्येक वर्षी १० वर्षापर्यंत त्याबाबत प्रमाणपत्र मंजुरी देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक असेल. ज्या स्वयंसहायता बचत गटांनी पॉवर ट्रीलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला आहे, त्या बचत गटांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनांच्या लाभासाठी पात्र स्वयंसहायता बचत गटांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, दूध डेअरी रोड, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे संपर्क साधून अर्ज सादर करावे, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos