महत्वाच्या बातम्या

 पार्थिव घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ चा अपघात : एक ठार तर एक जण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर येथून छत्तीसगड राज्यात पार्थीव घेवून जाणाऱ्या स्काॅर्पीओचा अपघात झाल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मुल तालुक्यातील जानाळा जवळ घडली. अपघातग्रस्त स्काॅर्पीओ मध्ये चालकासह एकुण सहा जण प्रवास करीत होते.

चंद्रपूर जवळील पडोली लखमापूर परीसरातील कोल डेपो मध्यें काम करणारे केशवराम यादव (६०) यांचे काल रात्री निधन झाले होते. छत्तीसगड मधील मानकापूर जिल्हयातील बोहरमभेडी येथील मूळ रहिवासी असल्याने मृतक केशवराम यादव याचे पार्थीव अंत्यसंस्काराकरीता त्याचे मूळ गांवी घेवून जाण्यासाठी त्याचे नातेवाईक छगनलाल साहु व इतर दोघेजण स्काॅर्पीओ क्रमांक एचएच ३४ बीएफ ००५० ने सकाळी ९ वाजताच्या दरम्यान लखमापूर येथून छत्तीसगड कडे रवाना झाले.

दरम्यान सकाळी १० वाजता च्या दरम्यान मूल मार्गावरील जानाळा गावाजवळ स्काॅर्पीओ चालक अश्वजीत रूपचंद सहारे (२६) रा. दुर्गापूर याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मार्गावरील पुलाच्या कठडयाला स्काॅर्पीओने धडक दिली.

अपघातग्रस्त वाहन भरधाव वेगात असल्याने वाहनाच्या धडकेने पुलाचा कठडा तुटून मार्गाच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक दिली. यामध्यें गोंदिया जिल्हयातील अर्जूनी मोरगांव तालुक्यातील बुटाई येथील रहीवासी असलेले सचिन मोहन साखरे ३२ वर्ष याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. मृतक सचिन साखरे हा स्काॅर्पीओ चालक अश्वजीत सहारे याचा नातेवाईक असून पार्थीव पोहोचवून परत येतांना सोबतीला एक जण असावा म्हणून स्काॅर्पीओ चालकाने त्याला सोबत घेतले होते. अपघाता मध्यें छगनलाल साहु  यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालय येथे हलविण्यात आले. इतर दोघांना किरकोळ जखमी झाले असून ते सुखरूप आहेत. घटनेची माहिती होताच मूल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुमीत परतेकी यांचे मार्गदर्शनात स्थानिक पोलीस कर्मचारी करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos