लोकसभा निवडणूक : निकाल अवघ्या काही तासांवर, उमेदवार, कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली


- विदर्भ न्यूज एक्सप्रेस देणार प्रत्येक अपडेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येवून ठेपला आहे. यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची  धाकधूक वाढली आहे. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या निवडणूकीचे तसेच देशातील सर्वच जागांचे अपडेट आमच्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी उद्या २३ मे रोजी विदर्भ न्यूज एक्सप्रेस सज्ज राहणार आहे. प्रत्येक फेरीची अपडेट माहिती वाचकांपर्यंत पोहचविली जाणार आहे.
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राची मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजतापासून चंद्रपूर मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी १० वाजतापर्यंत पहिल्या फेरीचे निकाल अपेक्षित आहे. लोकसभा  क्षेत्रात पाच उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे निकाल लवकरच लागणार आहे. निकालासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. गडचिरोली शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
मतमोजणीसाठी ८४ टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ८०० अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणी करणार असून मतमोजणीच्या एकूण २५ फेऱ्या होणार आहेत. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात भाजपाचे अशोक नेते आणि काॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. नामदेव उसेंडी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. निकालाअंती कोण बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. यावेळी वंचित बहून आघाडीसुध्दा आपल्या पारड्यात बरीचशी मते पाडून घेण्याची शक्यता आहे.
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात ७१.९८  झाले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात ९४ हजार ४४० पुरुष मतदार व ९१ हजार ५६३ महिला मतदार अशा  एकूण १ लाख ८६ हजार ३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.  गडचिरोली विधानसभा क्षेत्रात    १ लाख ७ हजार २४ पुरुष आणि १ लाख ७९५ महिला अशा २ लाख ७ हजार ८१९ मतदारांनी मतदान केले आहे.  अहेरी विधानसभा क्षेत्रात  ८२ हजार ३९३ पुरुष आणि ७५ हजार ७१३ महिला अशा एकूण १ लाख ५८ हजार १०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.  आमगाव  विधानसभा क्षेत्रातून ९० हजार ६८३ पुरुष आणि ९० हजार ७८७ महिला अशा एकूण १ लाख ८१ हजार ४७० मतदारांनी मतदान केले आहे.  ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातून  १ लाख २ हजार २०० पुरुष आणि ९९ हजार ३७७ अशा एकूण २ लाख १ हजार ५७७ मतदारांनी मतदान केले आहे.  चिमुर लोकसभा क्षेत्रात १ लाख ३५ हजार ५० पुरुष आणि ९८ हजार ७७० महिला अशा एकूण २ लाख २ हजार ३२० मतदारांनी मतदान केले आहे.  लोकसभा क्षेत्रातून १५ लाख ८० हजार ७० मतदारांपैकी  ११ लाख ३७ हजार २९६ मतदारांनी मतदान केले असून उद्या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.     Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-22


Related Photos