५० टक्के चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची विरोधकांची मागणी फेटाळली, मोजणीत कोणताही फेरबदल होणार नाही


- निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण 
वृत्तसंस्था /  नवी दिल्ली
: ईव्हीएम मशीनमध्ये कोणतीही गडबड झाली नसल्याची खात्री व्हावी म्हणून व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबतच मोजणी करण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीत कोणताही फेरबदल होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एका मॅरेथॉन बैठकीत आयोगाने विरोधकांची ही मागणी फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं.
 लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी असतानाच निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याने विरोधाकांना मोठा झटका बसला आहे. 
व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठी आणि ईव्हीएममधील मतं जुळतात की नाही हे पाहण्यात यावीत, त्यासाठी व्हीव्हीपॅटमधील किमान ५० टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबत मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज मॅरेथॉन बैठक पार पडली. त्याला निवडणूक आयुक्त अशोक लवासाही उपस्थित होते. विरोधकांची मागणी मान्य केली तर मतमोजणीला २ ते ३ दिवस लागतील, असं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं मत बनल्यानेच त्यांनी विरोधकांची ही मागणी फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं.   निकालाच्या दोन दिवस आधी काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, टीएमसीसहीत २२ पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन ही मागणी केली होती.   Print


News - World | Posted : 2019-05-22


Related Photos