माजी आमदार सुभाष धोटे व राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना तिन दिवसांची पोलीस कोठडी


 -  राजुरा न्यायालयात पोलीस व महीलांत शाब्दिक चकमक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा  :
विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले माजी आमदार सुभाष धोटे व राजुराचे  नगराध्यक्ष अरुण धोटे यांना न्यायालयाने  तिन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. 
कल्याण नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी माजी आमदार सुभाष धोटे व नगराध्यक्ष अरुण धोटे यांना राजुरा न्यायालयाने तिन दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे येथे खळबळ उडाली आहे. नगराध्यक्षांना पोलीस कोठडी सुनावण्याची राजुरा नगराच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे.
कल्याण नर्सिंग महाविद्यालय येथे एएनएम च्या दुसऱ्या  वर्षाला शिशिकणाऱ्या एका मुलीने अतिशय गंभीर तक्रार प्राचार्य गुरुराज कुळकर्णी, माजी आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे व इतर तिघांविरुद्ध  पोलीस अधीक्षकांकडे  केली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे व पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बोबडे यांनी पिडितेला राजुरा पोलीस ठाण्यात आणून तक्रार नोंदवुन घेतली.  काल २० मे रोजी रात्री दहा वाजता सुभाष धोटे व अरुण धोटे यांना अटक करुन सुरक्षेच्या कारणास्तव बल्लारपुर पोलीस ठाण्यात ठेवले. आज राजुरा येथील न्यायाधीश व्ही.एस.मेंढे यांच्या न्यालयात हजर केले असता   न्यायाधीश यांनी धोटे बंधूंना  २४ मे पर्यंत तिन दिवसांची पोलीस कोठडी दिली. आरोपीतर्फे ॲड. प्रशांत खजांची व पोलीसांतर्फे सरकारी वकील ॲड.  क्षिरसागर यांनी बाजु मांडली.
यावेळी न्यायालयात व बाहेर काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते तसेच आदिवासी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. उपविभागिय पोलीस अधिकारी शेखर देशमुख व ठाणेदार बाळू गायगोले यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

पोलिसांची महिलांशी हुज्जत 

दरम्यान राजुरा न्यायालयात वकिलांच्या बार रुममध्ये ॲड . निनाद येरणे यांच्या कडे  कुन्दा सलामे व  मंदाताई कोडापे रा.  राजुरा  ह्या  कोर्टात सुरू असलेल्या भिवसन देवाच्या प्रकरणात वकिलांशी केस संदर्भात चर्चा करून सल्ला घेण्यासाठी बाररूम मध्ये बसून असताना राजुरा पोलीस स्टेशन मधील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक भारती ह्यांनी दोन्ही महिलांशी अरेरावी करून अपमानजनक वागणुक देत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
आपण वकिलांशी भेटायला आलो आहे असे त्यांनी वारंवार सांगूनही दोन्ही महिलांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. यावेळेस तिथेच उपस्थित असलेले शिवसेनेचे नितीन पिपरे यांनी महिलांना बाहेर काढण्यात आक्षेप घेतला. यावेळी काँग्रेसचे पन्नासपेक्षा अधिक कार्यकर्ते बार रुम व न्यायालयात उपस्थित होते. त्यांचेबाबत पोलिस मात्र मवाळ भूमिका घेत होते, परंतू या दोन महिलांना बाहेर काढण्याचा अट्टाहास कां, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सामान्य नागरिकांना कोर्टात वकिलांना केस संदर्भात माहिती विचारण्यासाठी पोलिस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल का, असा प्रश्न या महिलांनी उपस्थित केला आहे. अरेरावीच्या भाषेत बोलुन महिलांचा अपमान करणाऱ्या  पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दोन्ही महिलांनी केली आहे.
आज विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपी माजी आमदार सुभाष धोटे व राजुरा चे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना राजुरा न्यायालयात हजर करणार असल्याने सुरक्षीततेच्या कारणाने कदाचित हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु एखाद्या राजकीय नेत्याला आरोपी म्हणून न्यायालयात आणतांना अशी भूमिका पोलिसांनी घेणे आश्चर्यकारक आहे.
    Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-21


Related Photos