विद्युत प्रवाहाने रानडूकरांची शिकार करणाऱ्या १६ आरोपींना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
तालुक्यातील कसारी येथील शेतात धान पिकाच्या भोवती संरक्षणासाठी लावलेल्या तारांना विद्युत प्रवाह सोडून रानडूकरांची शिकर करणाऱ्या दुधराम आत्माराम मडावी (४५)  रा. कसारी याच्यासह १६ जणांना वन्यजीव कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.
कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी हा आपल्या शेतात शिकार करीत असल्याची गोपनिय माहिती वनविभागास मिळाली. त्या आधारे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता सदर व्यक्तीच्या शेतात विद्युत तारेने शिकार केल्याचे पुरावे व रानडुकराचे अवशेष आढळून आले. यावरून दुधराम मडावी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने आपल्या १५ साथीदारांची नावे सांगितली. वनविभागाने १६ जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम २ (१६), ९, ३९, ४४, ४८, ५१ व जैवविविधता अधिनियम २००२ कलम ५६ अन्वये कारवाई करून सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले. 
या कारवाईसाठी उपविभागीय वनाधिकारी एस.जी. कैदलवार, वनपरीक्षेत्राधिकारी आर. एम. शिंदे, मेनेवार, माडावार, ठाकरे व वनकर्मचाऱ्यांनी  सहकार्य केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-21


Related Photos