कंटेनर प्रवासी वाहनावर कोसळले , १३ जण जागीच ठार


वृत्तसंस्था / बुलडाणा :  कंटेनरचे टायर फुटून प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीवर धडकल्याने १३ जण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजतादरम्यान मलकापूरजवळील राष्ट्रीय महामार्गावरील रसोया कंपनीसमोर घडली.   घटनेत जीवाच्या आकांताने तडफडणाऱ्या प्रवाशांना अक्षरश: ओढून बाहेर काढावे लागले.
  मलकापूर येथील तहसील चौकातील स्थानकावरून अनुराबाद-झोडगा प्रवासी वाहतूक करणाऱ्या महिंद्रा मॅक्झिमो गाडी (क्र. एम.एच.४६ एक्स ७९२५) १५ प्रवासी घेऊन निघाली होती. रसोया कंपनीजवळ गाडी येताच मुक्ताईनगरकडून अकोल्याकडे जाणाऱ्या कंटेनरचा समोरचा टायर फुटला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर मॅक्झिमो गाडीवर धडकला. या अपघातात अनुराबाद येथील गाडीचालक अनिल मुकुंद ढगे (४०), छाया गजानन खडसे (३७), किसन सुखदेव बोराडे (३०), अशोक लहु फिरके (५५), नत्थू वामन चौधरी (४५); मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील नागझरीच्या सोमीबाई छगन शिवरकर (२९), आरती (१८), रेखा (१७), वीरेन छगन बिलोरकर (०७), सतीष छागन शिवरकर (०८), मीनाबाई गोकुल बिलोरकर (३०); भुसावळ येथील प्रकाश किसन भारंबे व मेघा प्रकाश भारंबे असे १३ जण जागीच ठार झाले. जखमींमध्ये नागझरी येथील गोकुल भालचंद्र भीलवसकर (३०), छगन राजू शिवरकर (२६) व अनुराबाद येथील रोहित नत्थू चौधरी यांचा समावेश आहे.  
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी चक्क गाडी कापून काढावी लागली. तर गाडीवरील ट्रक काढण्यासाठी सुमारे एक तास लागला. अपघातानंतर दोन तास दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. 
अपघातासाठी कारणीभूत ठरलेला कंटेनर  स्फोटके वाहून नेणारा होता. अपघातानंतर त्यातील स्फोटकांचा स्फोट झाला असता तर जीवितहानी अधिक मोठ्या प्रमाणात झाली असती, अशी भीती व्यक्त होत आहे. सध्या हा कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-05-21


Related Photos