पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार


वृत्तसंस्था /  नवीदिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २० मे रोजी  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याचे कळते.  अमर उजालाने याबाबत वृत्त दिले आहे.  काल मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर  २३ मे रोजी निकालानंतर एक्झिट पोल प्रमाणे परिस्थिती कायम राहिली तर काय संभाव्य पावले उचलावी याबाबत दोघांच्या भेटीत चर्चा होऊ शकते.
पंतप्रधान मोदी नागपूर येथील संघ मुख्यालयात जाऊन भागवत यांची भेट घेतील. यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये चर्चा होईल. २३ मे रोजी येणाऱ्या निकालांपूर्वी होणाऱ्या दोघांच्या या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या चार वर्षात मोदींचा संघाच्या मुख्यालयावरचा हा पहिलाच दौरा असणार आहे.
दरम्यान, जर एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर संघाकडून पंतप्रधानपदासाठी मोदींच्या जागी दुसऱ्या नेत्याच्या नावाचा प्रस्ताव मांडू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे मोदींची ही भेट संघ प्रमुखांचे मन वळवण्याचा प्रयत्न आणि पंतप्रधानपदासाठी आपल्याच नावाला पाठींबा मिळावा यासाठी असू शकते असेही सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून मोदी संघाच्या मुख्यालयापासून दूर होते.   Print


News - Nagpur | Posted : 2019-05-20


Related Photos