नवविवाहितेचे बसस्थानकावरून प्रियकरासोबत पलायन , पतीला जबर धक्का


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  माहेरी आलेल्या नवविवाहितेने प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना गणेशपेठ बसस्थानक परिसरात घडली असून  या घटनेने २१ वर्षीय विवाहितेच्या पतीला जबर धक्का बसला आहे. विवाहितेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी २५वर्षीय युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अमोल डोंगरे (रा. इंदिरानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी युवतीचे छत्तीसगडमधील राजनंदगाव येथील २५ वर्षीय युवकासोबत  लग्न झाले. पाच दिवसांपूर्वी दोघेही   नागपुरात आले . शनिवारी सकाळी युवक पत्नीसह छत्तीसगडला परत जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर आला. फलाट क्रमांक दोनवर दोघेही गाडीची वाट बघत होते. दरम्यान युवतीचा पती लघुशंकेला गेला. यावेळी अमोल हा नवविवाहितेजवळ  आला. अमोल तिच्याशी बोलत असतानाच तिचा पती परतला. त्याने अमोलबाबत पत्नीकडे विचारणा केली. भाऊ असल्याचे  तिने  सांगितले. 'गाडीला दोन तास उशीर आहे. तुम्ही बसने राजनांदगावला जा', असे अमोलने त्यांना सांगितले.  अमोल दोघांसह ट्रिपलसीट मोटरसायकलने गणेशपेठेतील बसस्थानकावर आला. तिकीट काढून आणतो, असे सांगून अमोल तेथून गेला. काही वेळाने तो तिकीट घेऊन आला. त्याने युवकाला एकच तिकीट दिले. एकच तिकीट आणल्याबाबत  अमोलला विचारणा केली. याचदरम्यान लघुशंकेला जात असल्याचे सांगून  पत्नी तेथून गेली. अन्य एक तिकीट काढून आणतो, असे सांगून अमोलही तेथून गेला. पत्नी परत न आल्याने युवकाने तिचा शोध सुरू केला. पत्नी व अमोल मोटरसायकलने जात असल्याचे त्याला दिसले. त्याने सासरकडील मंडळीला याबाबत माहिती दिली. यावेळी युवतीची आई  व अन्य नातेवाइक बसस्थानकावर आले. दोघांचा शोध घेतला. मात्र, आढळले नाही. त्यानंतर युवकाने गणेशपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. गणेशपेठ पोलिसांनी अमोलविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.   Print


News - Nagpur | Posted : 2019-05-20


Related Photos