महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील २२० शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे देण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी प्रत्येकी ७५ हजार रुपयाच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. योजनेंतर्गत समाविष्ठ विविध आकारमानाच्या शेततळ्यापैकी कोणत्याही एक शेततळ्याकरीता महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

सिंचनाअभावी पिक उत्पादनात होणारी घट थांबविणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न व उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे, राज्यात पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारीत जलसंधारणाच्या उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविणे, शेतकऱ्यांना शेततळे खोदकामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनुदान या योजनेंतर्गत देण्यात येणार आहे. शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांच्या पाणलोट क्षेत्रातील भूगभार्गातील पाण्याचे पुनर्भरण होऊन आपत्कालीन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.

पुरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. चिबळ व पाणथळ जमीन सुधारणेसाठी शेततळ्याचा चांगला उपयोग होतो. मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग होतो. पिकावर औषधे फवारणीसाठी शेतात मुबलक पाणी उपलब्ध होते. शेततळ्याकरीता मागणी अर्ज महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने सादर करु शकतात. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता २३ रुपये ६० पैसे इतके शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज भरतांना महाडीबीटी प्रणालीवर लॉगीन केल्यानंतर सिंचन साधने व सुविधा या टाईल अंतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब निवडण्यात यावी. यानंतर इनलेट आऊटलेट सह, इनलेट आऊटलेट शिवाय यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा. त्यानंतर शेततळ्याचे आकारमान व स्लोप निवडण्यात यावा. तसेच इतर आवश्यक माहिती भरुन अर्ज प्रक्रिया पुर्ण करावी.

यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा ७/१२, ८/अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, हमीपत्र, जातीचा दाखला अपलोड करावा लागतो.   योजनेंतर्गत जिल्ह्यात अनुज्ञेय असलेल्या उपघटकाकरीता एकुण ४५६ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३५५ लाभार्थी शेतकऱ्यांची लॉटरी पध्दतीने निवड झालेली आहे. परंतु यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी अर्ज रद्द केले असून काही शेतकऱ्यांनी खोदकाम पूर्ण केले आहे. वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना येत्या काळात चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी अर्ज रद्द न करता शेततळ्याचे खोदकाम करुन शेततळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos