कोण होणार खासदार? गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातील मतदारांमध्ये उत्सूकता शिगेला


- ग्रामीण भागाची काॅंग्रेसला साथ, तरीही भाजपा करेल काय मात?
- ७१.९८  टक्के मतदारांनी केले आहे मतदान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
१७ व्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले तर देशातील सातही टप्प्यातील निवडणूकीसाठीचे मतदान आज १९ मे रोजी पार पडले. आता २३ मे रोजी होत असलेल्या निकालाकडे देशवासीयांचे लक्ष लागले असून गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचा खासदार कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. निकालाची तारीख अवघ्या तीन दिवसांवर आली असल्याने उमेदवारांमध्येही धाकधूक वाढली आहे. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातील ७१.९८  टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्ष आणि काॅंग्रेसमध्ये थेट लढत आहे. यामुळे काॅंग्रेस बाजी मारणार की, भाजपा आपले वर्चस्व कायम राखणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. सध्या लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी पाच विधानसभा क्षेत्र भाजपाकडे आहेत. तर केवळ एक विधानसभा क्षेत्र काॅंग्रेसकडे आहे. दोन्ही पक्षांनी आपआपली शक्ती पणाला लावली असली तरी लोकसभा क्षेत्रात निवडणूक काळात पाहिजे तेवढा उत्साह दिसून आला नाही. मात्र जसजशी निकालाची तारीख जवळ येत आहे तसतसे तर्क - वितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात बेरोजगारी, सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा विविध मुद्द्यांचा बॅकलाॅग आहे. मागील पाच वर्षात भाजपचे सरकार असताना या मुद्द्यांवर पाहिजे तेवढे लक्ष्य दिसून आले नाही. यामुळे बेरोजगार आणि विशेषतः ग्रामीण जनता काॅंग्रेसच्या बाजूने मत देईल, असा अंदाज होता. मात्र काॅंग्रेसच्या नेत्यांनी या लोकसभा क्षेत्राकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिल्याचे दिसत नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते किंवा प्रचार वाहने पोहचली नाही. जिल्ह्यातील ग्रामसभांनी काॅंग्रेसला पाठिंबा दिला. दुर्गम भागात नक्षल्यांकडूनही भाजपा सरकारला विरोध दर्शविला जात होता. अशात काॅंग्रेसला फायदा होईल काय, असा तर्क लावला जात आहे. तर २०१४ च्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांना मिळालेल्या मताधिक्क्याचा विचार करता अशोक नेतेच पुन्हा विजयी होउ शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तूळात आहे.
२०१४ च्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांना ५ लाख ३५ हजार ९८२ इतके मतदाधिक्क्य मिळाले होते. तर काॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. नामदेव उसेंडी यांना २  लाख ९९ हजार ११२ मते मिळाली होती. यावर्षी पाच उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. यापैकी इतर उमेदवार किती मते आपल्या पारड्यात पाडून घेतात आणि भाजपा किंवा काॅंग्रेस यापैकी कोण विजयाची माळ गळ्यात घालून घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस लवकरच आपले एक्झिट पोल वाचकांपर्यंत पोहचवणार आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-19


Related Photos