२० दिवसांपासून जिल्ह्यात नक्षल्यांचा धुमाकूळ, जाळपोळ, स्फोट, हत्यासत्रामुळे नागरीकांमध्ये दहशत


- पोलिस विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज
- बॅनर, पत्रकबाजीमुळे दुर्गम भागातील जनजीवन विस्कळीत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गेल्या २० दिवसांपासून म्हणजे ३० एप्रिलपासून नक्षल्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ माजविला आहे. जाळपोळ, स्फोट, हत्या आणि बॅनर व पत्रकबाजीमुळे नक्षल्यांच्या दहशतीने दुर्गम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कालावधीत मात्र पोलिसांची कारवाई थंड दिसत असल्यामुळे नागरीकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नक्षल्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता पोलिस विभागाने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.
लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत नक्षल्यांनी बॅनरबाजी करून निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. काही ठिकाणी मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था असतानाही नक्षल्यांनी घातापाचे डाव आखले होते. एटापल्ली तालुक्यात एका मतदान केंद्राजवळ नक्षल्यांनी स्फोट घडवून आणला होता. यामध्ये दोन जवान जखमी झााले होते. नक्षल्यांच्या भितीमुळे एटापल्ली तालुक्यातील ४ मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबवून दुसऱ्या दिवशी मतदान घेण्यात आले होते. तसेच धानोरा तालुक्यातील एका पुलाखाली भुसुरूंग लावण्यात आले होते. या सर्व घडामोडीनंतर २७ एप्रिल रोजी सी - ६० पथकाच्या जवानांनी भामरागड तालुक्यात दोन महिला नक्षलींना कंठस्नान घातले होते. सध्या नक्षली या महिला नक्षलींना खोट्या चकमकीत ठार केल्याचे सांगत बंदचे आवाहन केले आहे. 
शांत असलेल्या उत्तर गडचिरोली भागात मोठ्या संख्येने आलेल्या नक्षल्यांनी ३० एप्रिल रोजी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती. या आधीच त्यांनी पोलिसांना टार्गेट करण्यासाठी जांभुळखेडा नजीक पुलाखाली स्फोटके पेरली होती. पोलिसांचे वाहन दादापूरकडे जात असतानाच स्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये शिघ्र कृती दलाचे १५ जवान शहीद झाले. तसेच खासगी वाहन चालक ठार झाला. यानंतर या भागात पोलिसांनी दोन दिवस नक्षलविरोधी अभियान राबविले. तरीही नक्षल्यांची बॅनरबाजी सुरूच होती. कंत्राटदारांना रस्त्याची कामे थांबविण्याची धमकी नक्षली देत होते. यामुळे रस्त्यांची कामे ठप्प पडली आहे. या घटनेनंतर नक्षल्यांनी भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात दोन नागरीकांची हत्या केली. एटापल्ली तालुक्यात दोनदा रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केली. गेल्या अनेक दिवसांपासून भामरागड, एटापल्ली तालुक्यात ठिकठिकाणी पत्रके, बॅनर आढळून येत आहेत. नक्षल्यांनी पुकारलेल्या बंददरम्यान हिंसक कारवाया सुरूच आहेत. कुरखेडा आणि एटापल्ली तालुक्यात वनविभागाचे बिट जाळण्यात आले. भामरागड तालुक्यात रस्ता कामावरील रोडरोलर जाळण्यात आला. गुरूपल्ली जवळ झाडे तोडून रस्ता अडविण्यात आला. या सर्व कारवाया बघता मागील २० दिवसात नक्षल्यांनी आपल्या कारवायांमध्ये कुठलाही खंड पडू दिला नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यात दहशत निर्माण झाली आहे. मात्र पोलिस विभागाकडून या कारवायांवर ठोस पावले उचलले जात नसल्याचे दुर्गम भागातील नागरीकांमधून बोलल्या जात आहे.  

आत्मसमर्पण योजनेमुळे नक्षलवादाला मिळतेय बळ?

शासनाने सुरू केलेल्या नक्षल आत्मसमर्पण योजनेमुळे दुर्गम भागातील अनेक जण नक्षल कारवायांमध्ये सामिल होत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. दुर्गम भागामध्ये नक्षली वावर करतात. यामुळे काही युवक त्यांच्या संपर्कात येतात. हे युवक काही दिवस नक्षल्यांसाठी काम करून अनेक घटनांमध्ये सहभागी होतात. पत्रके टाकणे, बॅनर लावणे, जाळपोळ अशा घटनांमध्ये सहभाग झाल्यानंतर  ते पोलिसांपुढे आत्मसमर्पण करतात. यामुळे आत्ममर्पण योजनासुध्दा नक्षलवादाला बळ देत असल्याची चर्चाही जोर धरत आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-19


Related Photos