गडचिरोली नगर परिषदेचा महाप्रताप, फुटलेल्या रस्त्यावर घनकचऱ्याची मलमपट्टी!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक नगर परिषदेने रस्त्यावरील पाणी वाहून जाणारी पायली फुटलेल्या जागी नवीनच तंत्रज्ञान वापरल्याचे दिसून येत आहे. पायली फुटलेल्या जागी नालीतून उपसा केलेला घनकचरा तसेच गाळ टाकला या नवीन प्रकारच्या मलमपट्टीमुळे नागरीकांनी नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 
स्थानिक सद्गुरूनगर वार्डातील गटसाधन केंद्रासमोरील रस्त्यावरील रस्त्याच्या मधोमध असलेली पाणी वाहून जाणारी पायली काही दिवसांपूर्वी फुटली. या ठिकाणी अनेक दिवस मोठे भगदाड पडले होते. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. काही नागरीकांना नगर परिषदेला कळविल्यानंतर पायली बदलविण्यात आली. मात्र ही पायली अल्पावधीतच फुटली. यानंतर या ठिकाणी मातीचा भरणा करण्यात आला. एवढे करूनही खड्डा बुजत नसल्याचे पाहून नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नालीतील उपसा केलेला गाळ या ठिकाणी आणून टाकला. 
या ठिकाणी पक्की मोरी बांधकाम करणे आवश्यक आहे. मात्र नगर परिषदेच्या वतीने मोरी बांधकाम न करता वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून पडलेला खड्डा बुजविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त केला असून नगर पालिकेच्या अनागोंदी कारभाराप्रती तिव्र असंतोष व्यक्त केला आहे. नगर पालिकेच्या खड्डा बुजविण्याच्या अनोख्या शक्कलमुळे सोशल मिडीयावर खिल्ली उडविली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-19


Related Photos