नक्षल्यांचे जिल्हा बंदचे आवाहन , पोलीस दल सतर्क


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली  : 
एप्रिल २०१८ मध्ये तसेच २७ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या  झालेल्या चकमकीच्या निषेधार्थ नक्षल्यांनी आज १९ मे रोजी  गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.  मागील ३० एप्रिलपासून नक्षल्यांनी केलेल्या हिंसक कारवाया लक्षात घेता महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात सतर्कतेचा इशारा  देण्यात आला आहे. 
जिल्ह्यात गेल्या २७ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत रामको आणि शिल्पा या महिला माओवादी ठार झाल्या होत्या. तसेच मागील वर्षी एप्रिल महिन्यात चकमकीत ४० नक्षली ठार झाले होते.  यानंतर नक्षल्यांनी जाळपोळ, स्फोट, हत्या अशा घटना घडवून आणल्या. ३० एप्रिल च्या मध्यरात्री  कुरखेडा तालुक्यात दादापूर येथे वाहनांच्या जाळपोळीनंतर महाराष्ट्र दिनी १ मे रोजी  नियोजनबद्ध पद्धतीने लेंडारीच्या पुलावर भूसुरुंगस्फोट घडविला. यात १५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर माओवाद्यांनी भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयातून दोन जणांची हत्या केली होती. एटापल्ली तालुक्यात दोनदा वाहनांची जाळपोळ केली. पत्रके टाकून चकमकीविरोधात रोष व्यक्त केला होता. त्यातच माओवाद्यानी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले होते. माओवाद्यांच्या पश्चिम सब झोनल समितीने शुक्रवारी पत्रके टाकून बंदचे आवाहन केले होते. शनिवारी पुन्हा एटापल्ली तालुक्यात माओवाद्यांनी टाकलेली पत्रके आढळली. त्यातही बंदचे आवाहन माओवाद्यांनी केले आहे. 
कुरखेडा येथील भूसुरूंगस्फोटाच्या घटनेतर जिल्ह्यात सुरू झालेल्या कारवाया पाहता सुरक्षा यंत्रणेने माओवाद्यांच्या बंदमध्ये कुठलीही हिंसक घटना टाळण्यासाठी खबरदारी घेतली आहे. सी-सिक्स्टी कमांडो पथकांचे विशेष अभियान सुरू आहे. सीमावर्ती भागातील २५ हून अधिक अतिसंवेदनशील भागातील पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड आणि तेलंगण सीमेवरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-19


Related Photos