विखे-पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदाची निवड सोमवारी


वृत्तसंस्था /  मुंबई : राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यामुळे  रिक्त झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदी कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता आहे. सोमवारी आमदारांच्या बैठकीत ही निवड करण्यात येईल. काँग्रेसच्या गटनेत्याची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याचा निर्णय सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांवर अवलंबून असेल. सोमवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, तीत नव्या गटनेत्याची निवड केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. या बैठकीला राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत.
विखे यांचे पुत्र सुजय यांनी अहमदनगर मतदारसंघातून भाजपतर्फे लोकसभा निवडणूक लढविल्याने विखे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाकडे दिला होता. राहुल गांधी यांच्या शिर्डीतील सभेच्या आधी विखेंचा राजीनामा स्वीकारल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर केले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेतेपद रिक्त झाले होते.    नव्या गटनेत्याची निवड केल्यावर विधानसभा अध्यक्षांकडे पत्र सादर केले जाईल. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे याबाबत निर्णय घेतील.  
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी कोणाची वर्णी लागते याबाबत पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, उपनेते विजय वडेट्टीवार, नसिम खान यांच्या नावांची चर्चा आहे.    Print


News - Rajy | Posted : 2019-05-18


Related Photos