केंद्रात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार बनविण्यासाठी विरोधक कर्नाटक फॉर्म्युला वापरणार?


वृत्तसंस्था / दिल्ली :   येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याने केंद्रात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आघाडी सरकार बनविण्यासाठी विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रातही कर्नाटक फॉर्म्युला राबवण्याच्या शक्यतेवर विरोधक विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. 
२०१८ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. परंतु, भाजपला बहुमत मिळू शकले नव्हते. या निवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, ज्यादा सीट असूनही काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावर दावा केला नव्हता. त्यांनी जेडीएसला पाठिंबा देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. त्यामुळे केंद्रातही त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास 'कर्नाटक फॉर्म्युला' राबवला जाण्यासाठी विरोधकांकडून हालचाली सुरू आहेत. 
लोकसभा निवडणुकांमध्ये यावेळी कोणत्याच पक्षाला एकहाती बहुमत मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शह देऊन सत्तेत येण्यासाठी देशभरातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.    Print


News - World | Posted : 2019-05-18


Related Photos