विष प्राशन केलेल्या महिलेचा उपचारदरम्यान तोंडात स्फोट झाल्याने मृत्यू


- घटना CCTVमध्ये कैद 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
उत्तरप्रदेशातील अलिगढ येथे एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु असताना तिच्या तोंडात स्फोट झाला आणि मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास कथित स्वरुपात विष प्राशन केलेल्या महिलेला उपचारासाठी जेएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यानंतर डॉक्टरांनी या महिलेवर तात्काळ उपचार सुरु करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी या महिलेच्या तोंडात सक्शन पाईप टाकल्यानंतर अचानक स्फोट झाला. रुग्णालयात घडलेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांच्या एका टीमने सांगितले की महिलेने सल्फुयरिक ॲसीडीचे सेवन केलं असावं. त्यामुळे सक्शन पाइप तोंडात टाकताच ऑक्सिजनसोबत संपर्क आल्याने स्फोट झाला. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या प्रकरणात नेमकं काय झालं आहे हे तपास आणि अभ्यासानंतर समोर येईल. उपचारादरम्यान एखाद्या महिलेच्या तोंडात स्फोट होऊन मृत्यू झाल्याचं हे पहिलचं प्रकरण समोर आलं आहे. जेएन मेडिकल कॉलेजचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एसएस जैदी यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, मृतक महिलेचं नाव शीला देवी असल्याचं समोर आलं आहे. या घडलेल्या घटनेला दुजोरा देताना जैदी यांनी सांगितले की, या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचार सुरु असताना तिच्या तोंडात स्फोट झाला आणि धूर बाहेर पडू लागला. तिने विष प्राशन केलं होतं आणि हे विष तिच्यापोटातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांची टीम प्रयत्न करत होती तेव्हाच हा प्रकार घडला.  Print


News - World | Posted : 2019-05-18


Related Photos