पर्लकोटावरील पुलाचा प्रश्न रेंगाळलेलाच, भामरागडवासीयांचा वनवास संपणार कधी?


- कमी उंचीच्या पुलामुळे यावर्षीही पावसाळ्यात व्हावे लागणार जगापासून दूर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड :
राज्याच्या आणि जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील नागरीकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पर्लकोटा नदीवरील कमी उंचीचा पूल. या पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून रेंगाळलेली असल्यामुळे यावर्षीही भामरागड वासीयांना पावसाळ्यात जगापासून दूर व्हावे लागणार आहे.
नक्षलग्रस्त, घनदाट जंगलांनी वेढलेला, आदिवासी भागात गडचिरोली जिल्ह्याच्या आणि छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असलेला भामरागड तालुका विकासापासून कोसोदूर आहे. तालुक्याला १२८ ते १३० गावे जोडलेली आहेत. काही गावे पर्लकोटाच्या एका बाजूस तर काही दुसऱ्या बाजूस आहेत. तसेच संपूर्ण तालुक्याला चहुबाजूंनी नद्यांनी वेढले आहे.
पर्लकोटा नदीच्या पुलाचे बांधकाम १९८२ - ८३ मध्ये करण्यात आले होते. या पुलाच्या निर्मितीला आता ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. नदीमध्ये रेतीचा भरणा झाल्याने नदीचे पात्र छोटे झाले. आता पुल ठेंगणा झाला आहे. पुलाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. पुलावरील सिमेंट कांक्रीट उखळले आहे. पुलावर असंख्य छोटे - छोटे खड्डे पडलेले आहेत. भामरागड जवळून तीन नद्या वाहतात. यामुळे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्याच्या दिवसात घनदाट जंगलामुळे पाउसही मोठ्या प्रमाणात कोसळतो. यामुळे रोजच नद्यांना पूर येतो. यामुळे कमी उंचीचा पुल पाण्याखाली जातो. गावात पाणी शिरते. दीडशे ते दोनशे घरे पाण्याखाली जातात. व्यापारी, छोट्या - मोठ्या व्यावसायीकांना फटका सहन करावा लागतो. कुठेही बाहेर जाणे अशक्य होवून जाते. यामुळे आणखी किती वर्षे भामरागड पुरग्रस्त तालुका म्हणून ओळखला जाणार?, सरकार लक्ष देणार की नाही ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक मंत्री आजवर भामरागडला आले आहेत. मोठमोठे अधिकारी भेट देतात,  मात्र पुलाच्या उंचीसाठी कुणीही पुढाकार घेताना दिसत नाहीत. 
भामरागड हे तालुक्यातील गावांचे मुख्य ठिकाण आहे. सर्व कार्यालये, दवाखाना, राशन दुकाने याच ठिकाणी आहेत. यामुळे तालुक्यातील नागरीकांचे दैनंदिन भामरागडला येणे - जाणे असते. मात्र पूर परिस्थितीत नागरीकांचे जगणे कठीण होउन जाते. एकदा पूर आला की दोन ते तीन दिवस मार्ग बंद असतो. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गंभीर आजारी रूग्णांना वेळेवर उपचाराअभावी प्राण गमवावा लागतो. रूग्णालयातील अपुऱ्या सोयी - सुविधांअभावी इतरत्र रेफर करणेही शक्य होत नाही. यामुळे भामरागड वासीयांनी आणखी किती काळ हा वनवास भोगावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पुलाच्या कामाची निविदा लवकरच निघणार : तहसीलदार अंडील 

पर्लकोटा नदीच्या पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अने वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. निवेदने केली आहेत. यामुळे प्रयत्नांना लवकरच यश येणार आहे. येत्या २२ मे पर्यंत पुलाची निविदा काढली जाणार आहे. निविदा निघाल्यानंतर सबंधित कंत्राटदाराकडून लवकरच पुलाच्या बांधकामाला सुरूवात होईल, अशी माहिती भामरागडचे तहसीलदार कैलाश अंडील यांनी दिली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-17


Related Photos