उमरेडच्या स्ट्राँग रुममधून चोरीला गेलेल्या डीव्हीआर मधील ध्वनी-चित्रमुद्रण सुरक्षित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  उमरेड येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुममधील गेलेल्या डीव्हीआर मधील ध्वनी-चित्रमुद्रण सुरक्षित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
चोरीला गेलेल्या डिजिटल व्हीडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर)  मध्ये काही  छेडछाड झाली का, याबाबत शंका उपस्थित केली जात होती.  रामटेक लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान झाले. त्यामुळे उमरेड येथील तात्पुरत्या स्ट्राँग रुममध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आल्यापासून ते ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन गेल्यानंतरही १३ एप्रिलच्या रात्री ८.०८ वाजेपर्यंतचे चित्रीकरण सुरक्षित आहे असा अहवाल न्यायसहाय्यक प्रयोगशाळेने दिला आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमरेड विधानसभा क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे. या क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी ईव्हीएम पाठवणे व मतदान झाल्यानंतर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन गोळा करण्यासाठी उमरेड येथील आयटीआयमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्ट्राँग रुम तयार करण्यात आले होते. येथे अनेक तास ईव्हीएम व व्हीव्हीपॅट होते. त्यामुळे स्ट्राँग रुमममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. या कॅमेऱ्यांतून मिळणारे चलचित्र डीव्हीआरमध्ये साठवण्यात आले होते. या दोन डीव्हीआरमध्ये चार हार्ड डिस्क होत्या. हे डीव्हीआर चोरीला गेले. तरीही १५ एप्रिलपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली नाही. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी ईव्हीएमशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून उमरेड परिसरात फेरमतदानाची मागणी केली. त्यानंतर गुन्हा दाखल केला. डीव्हीआर चोराचा शोध सुरू असताना ४ मे रोजी सकाळी अचानक आयटीआयच्या प्रवेशद्वारात डीव्हीआर पडलेला दिसला. तो जप्त करण्यात आला. परीक्षणासाठी न्यायसहाय्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. प्रयोगशाळेने तपासणी करून त्यातील रेकॉर्डिग सुरक्षित आहे, असा अहवाल उमरेड पोलिसांना सादर केला. हा अहवाल आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.
   Print


News - Nagpur | Posted : 2019-05-17


Related Photos