आष्टी येथील हर्ष कृषी केंद्राच्या गोदामातून ३० लाख ४० हजारांचे बोगस बियाणे जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
चोरबीटी कॉटन बियाण्यांवर बंदी असतांना काही कृषी केंद्र संचालकाकडून बोगस बियाण्यांची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोपनिय माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील हर्ष  कृषी केंद्राच्या गोदामातून ३० लाख ४० हजारांचे बोगस बियाणे जप्तीची कारवाई केली. सदर कारवाई काल १५ मे रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र संचालकांचे धाबे दणाणले आहे.
 आष्टी येथे अनिल बाबुराव आलूरवार यांचे हर्ष कृषी केंद्र आहे. या कृषी केंद्रात खरीप हंगामासाठी बोगस बियाण्यांचा साठा करण्यात येत असल्याची गोपनिय माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे    धाड टाकली असता गोदामाबाहेर एम.एन.३३/२७७४ क्रमांकाच्या ट्रकमधून ३० लाख ४० हजार किमतीचे ४५० ग्रॅम वजनाचे ३८०० पॉकेट चोरबीटी बियाणे आढळून आले.सदर बियाणे जप्त करून आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 सदर कारवाई  जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांच्या मार्गदर्शनात कृषी उपसंचालक धनश्री जाधव, तालुका कृषी अधिकारी विरेंद्र राजपूत, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक एन.एम.डांगे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, तालुका कृषी अधिकारी बोरावार, कृषी सहाय्यक  श्रीनिवास रांगमलई, सुनिल तवाडे, लक्ष्मन देशमवार आदींनी केली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-16


Related Photos