आरमोरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची तहसीलदारांनी चौकशी करावी


- नागरीकांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदार सरकारी धान्य गोदामातून धान्य वितरणासाठी नेत आहेत. मात्र धान्य खरोखरच गरजू लोकांपर्यंत पोहचत आहे किंवा नाही याबाबत तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी करावी, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांना भेटी देवून केवळ व्हिजिट बुकवर सह्या केल्या जातात. दुकानदारांना कार्यालयात न बोलाविता दुकानाज जावून चौकशी  करणे आवश्यक आहे. गावातील राशन कार्ड धारकांसोबत संवाद साधावा, दुकानदारांच्या कार्यप्रणालीबाबत चर्चा करावी, किती धान्य मिळते, कोणते धान्य मिळते, बिल कोणते दिले जाते, साठा बुक कोणत्या प्रकारे भरले जाते याची चौकशी करणे गरजेचे आहे. 
स्वस्त धान्य दुकानात फलक लावून त्यावर पुरेपूर माहिती भरणे आवश्यक आहे. मात्र अनेक स्वस्त धान्य दुकानदारांडे फलकावर माहितीच भरली जात नाही. स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण, किरकोळ विक्रीचे मुल्य, अन्नधान्याची पात्रता, दुकान उघडे व बंद करण्याची वेळ, अन्नधान्याचा दर्जा आणि प्रमाण इत्यादीबाबत काही तक्रारी असल्यास त्या कोणत्या अधिकाऱ्यांकडे कराव्यात याबाबतची माहिती सुचना फलकावर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन क्रमांक आदी माहिती असणारा फलक सर्वांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. मात्र बऱ्याच दुकानांमध्ये असे दिसून येत नाही. असला तरी पुरेपूर माहितीच भरली जात नाही. यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय  होत आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-16


Related Photos