महत्वाच्या बातम्या

 आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहासाठी आणखी ६ महिने वाट पहावी लागणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मागील वर्षी मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस मधील स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय वसतिगृहाचे उद्घाटन महामहिम राज्यपाल यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडले. या उद्घाटना नंतर लगेचच हे वसतिगृह विद्यार्थ्यांच्या निवासासाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते.

परंतु एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी अजून हे वसतिगृह विद्यार्थ्यांच्या निवासासाठी उपलब्ध न झाल्याने सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले असून यात ४० ते ५० विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. दरम्यान उपोषणाच्या पार्श्वभूमीवर वसतिगृह सुरू करण्यासाठी अजून ६ महिन्याचा कालावधी लागेल असे लेखी म्हणणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. सुनील भिरूड यांनी कळविले असल्याची माहिती अभाविपने दिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात बांधण्यात आलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे नवीन वसतिगृह हे सहा मजली आहे. १४६ विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या वसतिगृहात वाचन कक्ष, ग्रंथालय आदी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र वसतिगृह सुरू करण्यासाठी आवश्यक फर्निचर कंत्राट प्रकिया अजून अपूर्ण आहे. वीज जोडणी पूर्ण झालेली नाही, मुबलक पाणी व्यवस्था नाही,उपहारगृह कंत्राट प्रक्रिया पूर्ण करून उपहारगृह व्यवस्था अपूर्ण आहे. तसेच वसतिगृहास लागून असलेल्या विद्यापीठाच्या संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या सर्व कामासंहित विद्यापीठ परिसरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक विभागानुसार जागा आरक्षित करून प्रवेश प्रकिया सुरू करणे आवश्यक असल्याची मागणी विद्यार्थी करीत आहेत.

मुंबई विद्यापीठ हे देशातील सर्वात जुने विद्यापीठ असून देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी मुंबई विद्यापीठात येत असतात. मुंबई सारख्या शहरात खाजगी जागेत निवास घेऊन राहणे हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नसून विद्यापीठाकडे वसतिगृह उपलब्ध असताना ते सुरू करण्यासाठी अजून ६ महिन्याचा अवधी लागेल असे कळविणे विद्यार्थ्यांच्या भावनांची केलेली थट्टा आहे. अगोदरच १ वर्षे उलटून गेलेले असताना अजून ६ महिन्याचा अवधी लागणे यावरून विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांप्रती किती निष्काळजी आहे हे दिसून येते असे मत अभाविप कोंकण प्रदेश मंत्री अमित ढोमसे यांनी व्यक्त केले.





  Print






News - Rajy




Related Photos