शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून सख्ख्या भावांनीच बहिणीवर केला ॲसिड हल्ला


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  ग्रेटर नोएडामध्ये   एका तरुणीवर दोन सख्ख्या भावांनीच ॲसिड  हल्ला केला. बहिणीचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. ॲसिड  हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस आरोपी भावांचा शोध घेत आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे नाव सलमा (२२) असे आहे. आरोपी भाऊ इरफान आणि रिजवान यांना शेजारी राहणाऱ्या लग्न झालेल्या व्यक्तीसोबत बहिणीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्यांनी तरुणीवर ॲसिड  हल्ला केला. ॲसिड हल्ल्यामध्ये तरुणीचा चेहरा, गळा आणि छाती गंभीररित्या भाजली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या आईने तिला सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केले तेव्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलीस तिची स्थिती पाहून हादरून गेले.
पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर माझ्या अम्मीला बोलवा असे बोलत आहे. परंतु तिची आई तिला रुग्णालयामध्ये दाखल करून निघून गेली. आता येथील कर्मचारी आणि परिचारिका तिची काळजी घेत आहेत. पोलीसही तरुणीची काळजी घेत असून एक व्यक्ती तिच्यावर नजर ठेऊन आहे. पाच दिवसानंतरही तिची परिस्थिती गंभीर आहे. ॲसिड  हल्ल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे आणि त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येऊ शकते असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. मुलीला रुग्णालयामध्ये दाखल करून निघून गेलेल्या आईचा पोलिसांनी शोध घेतला आहे. पोलिसांनी आईची आणि मुलीची भेट घडवून आणली. याबाबत पीडितेच्या आईला विचारले असता, माझ्यामध्ये तिला या अवस्थेमध्ये पाहण्याची ताकद नव्हती, म्हणून मी तिला उपचारासाठी दाखल करून गेले, असे त्यांनी सांगितले.     Print


News - World | Posted : 2019-05-15


Related Photos