बलात्कार करणाऱ्या आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावास, अडीच हजारांचा दंड


- गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मैत्रीणीच्या लग्नासाठी आल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे मामाच्या घरी झोपलेल्या युवतीला घरात ओढून नेत तिच्यावर बळजबरीने बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी ७  वर्षे सश्रम कारावास व २ हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावला आहे.
नरेश उर्फ गुड्डू जैराम उसेंडी (२९) रा. हेटी पो.ता. धानोरा असे आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलगी ३ जून २०१५ रोजी मैत्रीणीच्या लग्नासाठी आली होती. हळदीच्या कार्यक्रमास उपस्थित असताना तिची प्रकृती बरी नसल्याने ती आपल्या मामाच्या घरी खाटेवर झोपली होती. यावेळी तिला रात्री ९ ते ९.३०  वाजताच्या  सुमारास कोणीतरी खांद्याला धरून ओढत असल्याचे जाणवले. तिने डोळे उघडून पाहिले असता आरोपी नरेश उसेंडी हा तिला घरात ओढत नेत होता. तिने आरडाओरड केली. मात्र कार्यक्रमात लाउडस्पीकर सुरू असल्यामुळे तिचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही. या संधीचा तसेच अंधाराचा फायदा घेत आरोपीने पिडीतेचे केस पकडून मारहाण केली. तसेच अंगावरील कपडे काढून अत्याचार केला. तसेच कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. 
पिडीतेने दुसऱ्या दिवशी घटलेली हकीकत आपल्या वडीलांना सांगितली. तिला उपचाराकरीता गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले.  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विचारल्यावरून तसेच पोलिसांनी चिारणा केल्यानंतर तिने संपूर्ण हकीकत सांगितली. यानंतर धानोरा पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ , ५०६ , ३२३ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपी नरेश उर्फ गुड्डू उसेंडी याच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. 
या प्रकरणात प्रमुख सत्र न्यायाधिशांनी साक्ष पुरावा तपासून आरोपी नरेश उर्फ गुड्डू जैराम उसेंडी याला  कलम ३७६ भादंवि अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास, १ हजार रूपये दंड, कलम ५०६ भादंवि अन्वये ३ वर्षे कारावास तसेच १ हजार रूपये दंड, कलम ३२३ भादंवि अन्वये ३ महिने कारावास तसेच ५०० रूपये दंड ठोठावला आहे. 
सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता निलकंठ भांडेकर यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक भरत चौधरी  यांनी केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-15


Related Photos