मुलगा हरविल्याचा निरोप पोहचण्याआधीच तळोधी पोलिसांनी मुलाला सुखरूप पोहचविले घरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
खेळता - खेळता अचानक घराबाहेर पडलेला मुलगा हरविल्याचा निरोप पोलिसांपर्यंत पोहचण्याआधीच वाहतूक पोलिस शिपायाच्या सतर्कतेमुळे घरी पोहचल्यामुळे पोलिस विभागाच्या कार्यप्रणालीची सर्वत्र स्तुती होत आहे.
तळोधी येथील रहिवासी ४ वर्षांचा जय सकाळच्या सर्व विधी आटोपून आंघोळ, नाश्ता, तयारी करून ११ वाजताच्या सुमारास घराबाहेर खेळत होता. तो खेळत असल्यामुळे आई - वडील निश्चिंत होते. मात्र तो अचानक खेळता - खेळता बसस्थानकापर्यंत पोहचला. त्याला कुठे आलो हे कळलेच नाही. त्याला रडू कोसळले. हे दृश्य पाहून बसस्थानक परिसरात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने बाळाकडे धाव घेतली. त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र अवघ्या चार वर्षांच्या जय चे बोलणे काहीच समजत नव्हते. त्यांनी जवळपास विचारपूस केली. त्याची तयारी पाहून सर्वांना वाटत होते की, तो कुणासोबत तरी कुठेतरी जाण्यासाठी बसस्थानकावर आला असावा. गर्दीमध्ये आई - वडीलांचा शोध घेत असावा, असे वाटले. शेवटी वाहतूक पोलिसाने जय ला पोलिस ठाण्यात नेले. जय घाबरलेला असल्यामुळे रडणे थांबत नव्हते. यानंतर साध्या गणवेशातील महिला पोलिस कर्मचारी स्वाती दाताळे यांनी त्याला मायेची वागणूक देत चाॅकलेट खावू घातले. त्याला शांत केले. जय शांत तर झाला परंतु त्याला काहीच सांगता येत नव्हते. प्रभारी अधिकारी रोशन शिरसाठ यांना आई - वडीलांचा शोध कसा घ्यावा, असा प्रश्न पडला. आई - वडीलांचा शोध घ्यायचाच असे ठरवून पोलिस कर्मचारी कामाला लागले. ठाणेदार शिरसाठ यांनी प्रथम तळोधी गावातच शोध घ्यायला सुरूवात केली. याकरीता सहाय्यक फौजदार ततु मुडेवार, पोलिस हवालदार सतिश नेवारे, पोलिस शिपाई दिलीप चौधरी व महिला पोलिस शिपाई स्वाती दाताळे यांनी मिळून जय ला घेवून गावात विचारपूस सुरू केली. फिरता - फिरता जय ला घेवून पोलिस टिचर काॅलनीत पोहचले. येथे पोहचताच जय चे हावभाव बदलले. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो हात दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांना क्षणभर वाटले की जय याच परिसरातील आहे. पोलिसांनी गाडी थांबविली. जवळपास विचार करीत असतानाच एक महिला काहीतरी शोधत पुढे येताना दिसली. पोलिस त्यांना काही विचारणारच की लगेच त्या महिलेने माझा जय पोलिस गाडीत काय करीत आहे, अशी विचारणा केली. काय झाले, अशी विचारणा केली. पोलिसांनी घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. जय चे आई - वडील चांगलेच घाबरून गेले. एवढा प्रकार होवूनही त्यांना काहीच माहित नव्हते. जय चे वडील नितीन बोधुले आणि आईला जय ला पोलिसांकडे पाहून मन भरून आले. पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा पाहून त्यांना धन्यवाद दिले. पोलिसांनी जयला सोपवून कर्तव्यावर रवाना झाले.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-15


Related Photos