अरूंद राष्ट्रीय महामार्गामुळे भविष्यात गडचिरोलीकरांना सोसावा लागणार त्रास!


- करोडो रूपये खर्चूनही महामार्गाची रूंदी आधीच्या मार्गापेक्षाही कमी
- मोठमोठ्या नाल्यांच्या निर्मितीमुळे भविष्यात रस्ता रूंदीकरणाची शक्यता नाहीच 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरात केवळ चारच मुख्य मार्ग आहेत. हे चारही मार्ग आधीच अरूंद असून वर्दळीचेसुध्दा आहेत. आता या मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून सिमेंटीकरण करण्यात येत आहे. मात्र आधीच्या मार्गापेक्षाही नवीन मार्ग अरूंद होत असल्याने भविष्यात गडचिरोलीकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. केवळ रस्त्यालगतच्या इमारती, दुकानांचे नुकसान होवू नये, याकरीता रस्ता जसा आहे तसाच ठेवला जात असल्यामुळे व दोन्ही बाजूस मोठमोठी मजबूत गटारे तयार करण्यात येत असल्यामुळे भविष्यात या महामार्गाचे रूंदीकरण होईल की नाही, याबाबतही शंकाच आहे.
गडचिरोली शहरातील चारही मुख्य मार्गांलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. छोट्या - मोठ्या व्यावसायीकांची दुकाने सर्वच मार्गांवर आहेत.  हे अतिक्रमण काढून मार्गाचे रूंदीकरण करणे आवश्यक होते. मात्र मार्गालगतचे स्थानिक नागरीक, व्यापारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी वरीष्ठ पातळीवर एका बड्या मंत्र्यांकडे जावून मार्गाचे काम आहे तेवढेच ठेवण्यासाठी बाध्य केले. यामुळे यापुढेही आहे तिच परिस्थिती राहणार आहे. 
इंदिरा गांधी चौक ते काॅंम्प्लेक्स परिसर हा नेहमीच वाहनांच्या गर्दीने गजबजलेला असतो. काॅम्प्लेक्स परिसरात सर्व शासकीय कार्यालये आहेत. तसेच चंद्रपूर मार्गे जाणारी जड वाहने याच मार्गाने जातात. आठवडी बाजारही याच मार्गावर आहे. शासकीय रूग्णालय, न्यायालय, पोलिस मुख्यालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, कृषी विभागाचे कार्यालय, गोंडवाना विद्यापीठ ,  कृषी महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशी महत्वाची कार्यालये या मार्गावर आहेत. अनेकदा शासकीय कार्यालयांवर मोर्चे धडकतात, रॅली काढल्या जातात. अशावेळी प्रचंड वाहतूककोंडी होते. मोर्चे काढल्यानंतर एका बाजूचा रस्ता पूर्णपणे व्यापला जातो. यामुळे ऐकेरी वाहतूक सुरू होते. यामुळे अपघाताचा धोका बळावतो. गडचिरोली शहरात साधे लग्नाचे वऱ्हाडसुध्दा वाजत - गाजत जात असेल तरी वाहतूक कोंडी होते. अशाही परिस्थितीत महामार्गाची निर्मिती अरूंद केली जात असल्यामुळे भविष्यात काय परिस्थिती असेल याचा विचारही न केलेला बरा. महामार्गाच्या मधोमध रस्ता दुभाजक निर्माण केल्यास आणखी रस्ता अरूंद होउ शकतो.
महामार्गाची निर्मिती करताना आधी धानोरा, चामोर्शी, आरमोरी मार्गाचे शहराबाहेर काम करणे अत्यावश्यक होते. मात्र असे न करता धानोरा मार्गापासून महिला रूग्णालयापर्यंत आणि पोलिस ठाण्यापासून काम सुरू करण्यात आले. हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. शहरातून रस्त्याचे काम केले जात असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे वाहनांची गर्दी होत असून नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.   
नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात महामार्गाची निर्मिती करताना योग्य नियोजन करण्यात आले. यामुळे मोठे रस्ता दुभाजक निर्माण करून शहराला वेगळे रूप देण्यात आले आहे. तसेच मोठे फुटपाथ देण्यात आल्यामुळे नागरीकांना सोयीचे झाले आहे. मात्र गडचिरोली शहरात असे कोणतेही नियोजन नाही. जुना मार्ग जसा आहे त्याप्रमाणेच रस्त्याचे खोदकाम करून नव्याने निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे जिल्हा मुख्यालयीच अशी परिस्थिती असेल, लोकप्रतिनिधीच स्वतः पाठपुरावा करून रस्त्यांचा विस्तार करण्याऐवजी आणि विकासाकडे वाटचाल करण्याऐवजी विकासाला खिळ मारत असतील तर जिल्ह्यातून भ्रष्टाचार , नक्षलवाद, बेरोजगारी कशी नष्ट होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-14


Related Photos