सोहले गावानजीक दिसले अस्वल, बिबट , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


- पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 तालुका प्रतिनिधी / कोरची
: तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असलेल्या सोहले गावानजीक अस्वल आणि बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोहले येथे ११ मे रोजी सायंकाळी अस्वल पाण्याच्या भटकंतीसाठी गावाजवळील तलावात आली असावी असा अंदाज वन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून वर्तविला जात आहे. अस्वल हे हिंसक प्राणी असल्यामुळे जे लोक पहाटे ४-५ वाजता  उठून तेंदू पान संकलनासाठी धावपळ करीत आहेत त्यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच लोकांच्या मनात सुद्धा भीतीचे वातावरण आहे. 
 कोरची तालुका हा पूर्णपणे जंगलाने व्यापलेला असून येथील बहुतेक क्षेत्र हे वनाखाली येते आणि या जंगलात विविध पशुपक्ष्यांच्या संचार नेहमी बघितला जातो . परंतु उन्हाळ्याच्या कडाक्याच्या वेळेवर पाण्याची व्यवस्था न केल्यामुळे हिंसक जनावरांची आता गावाकडे भटकंती सुरू आहे . जे गावकरी,  शेतमजुरांकरिता धोकादायक असल्याचे चित्र आढळून येत आहे. 
  कोरची तालुक्यात उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्याची गरज असताना वन विभागाद्वारे जंगल परिसरातील बांधलेले कित्येक वन तलाव कोरडे पडले आहेत.  परंतु वन विभागाकडून यावर कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. शासनाच्या कोट्यवधी रुपये बिनाकामाचा उधळला जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच या बाबीची माहिती भ्रष्टाचार निवारण समिती कोरची तर्फे निवेदनाद्वारे वनपरिक्षेत्र अधिकारी बेळगाव यांना  देण्यात आली होती.  परंतु कोरची तालुकाच्या जंगलात वन्य प्राणी नसल्यामुळे पाण्याची सोय करण्याकरिता निधी उपलब्ध नाही करिता आम्ही काहीही करू शकत नसल्याचे धक्कादायक उत्तर वन विभागाकडून मिळाले. 
 नंतर  ७ एप्रिलला भ्रष्टाचार निवारण समितीच्या सदस्यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा  गजबे यांची भेट घेऊन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पाण्याची व्यवस्था करावी असे निवेदन दिले.  परंतु अजूनही कित्येक वन तलाव कोरडे असल्यामुळे हिंसक जनावरांना गावाकडे भटकंती करावी लागत आहे . जे गावकरी, परिसरातील नागरिक तसेच जनावरांना सुद्धा धोकादायक आहे.  कारण प्रत्येक घरात गाई-बैल आहेत.  मात्र भीतीमुळे गावकरी आपल्या घरासमोर   जनावरांना बांधून ठेवतात. 
 १२ मे ला सोहले येथेच आपल्या घराजवळील आवारात दीपक पुजारी सोहले हा तेंदूपान संकलनासाठी गेला असता त्याला बिबट आढळून आला आणि बिबट्याच्या हालचाली बघून दीपक पुजारी पळत सुटला आणि धावताना घसरून पडल्यामुळे त्याच्या उजव्या पायाला दोन टाके लागेपर्यंत मार लागला व डाव्या पायाला सुद्धा खरचटले आहे. 
  मागील वर्षी सोहले येथेच तेथील पोलीस पाटील यांच्यावर बिबट्याने  लग्नसराईच्या वेळेस हल्ला केला होता.  ज्याच्या मध्ये ते जखमी झाले होते. तलाव कोरडे पडल्यामुळे या हिंसक जनावरांची वाटचाल गावाकडे सुरू झाली असून गावकरी आपला जीव मुठीत घेऊन भीतीने आपली दिनचर्या करीत आहेत. 
  तेंदूपत्ता संकलन साठी असलेल्या  मजुरांना यांना विचारणा केली असता अस्वल गावालगत असलेल्या पळसाच्या झाडा  नजीक उभी होती.  गावातील लोक तेंदूपत्ता संकलन करून तिन्ही बाजूने येताना दिसले असता ती त्याच झाडावर दबा धरून बसली होती, अशी माहिती दिली.  सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही.  याची माहिती त्वरित वन विभागाला देण्यात आली.  वन विभागाचे कर्मचारी तिथे पोहोचून लोकांची गर्दी कमी केली व वातावरण शांत झाल्यानंतर ती अस्वल रात्री अकराच्या सुमारास झाडावरून खाली उतरून जंगलाच्या वाटेने पळून गेली. अस्वल आणि बिबट्याचा वावर असल्यामुळे मात्र नागरिक भयभीत आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-14


Related Photos