सुखी संसाराचे स्वप्न रंगवित असतानाच त्यांच्यावर काळाने घातली झडप !


- अपघातात गोपाल आणि कुंदाचे दुःखद निधन
- अहेरीत शोककळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
साता जन्माच्या रेशीमगाठी बांधून आयुष्यभरासाठी एकमेकांच्या साथीने सुखी संसाराचे स्वप्न रंगवित असलेल्या जोडप्यावर काळाने झडप घातली असून अहेरी येथील महतो आणि बिड्री  येथील गावडे परिवारावर शोककळा पसरली आहे. लग्नाच्या आणाभाका घेत कायदेशिर विवाह पार पडल्यानंतर लग्नाचा आनंद साजरा करण्याच्या तयारीत असतानाच गोपाल आणि कुंदा ला काळाने हिरावून नेले आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहेरी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोपाल रघुनाथ महतो रा. अहेरी आणि कुंदा इरपा गावडे रा. बिड्री  ता. एटापल्ली या दोघांनी जणू ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’ अशीच शपथ घेतली होती. काल १३ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गोपाल आणि कुंदाचे दुःखद निधन झाले. तसेच दुसऱ्या दुचाकीवरील चालकाचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. 
प्राप्त माहितीनुसार कुंदा हिच्या काकाचे निधन झाल्यामुळे गोपाल आणि कुंदा दुचाकीने बिड्री कडे जात होते. दरम्यान समोरून येत असलेल्या दुचाकीने अहेरी येथील प्राणहिता पोलिस मुख्यालयानजीक त्यांच्या दुचाकीला समोरून जबर धडक दिली. यामध्ये गोपाल आणि दुसरा दुचाकीचालक जागीच ठार झाले. या अपघातात कुंदा जखमी झाली होती. ती अपघात घडल्यानंतर उठून उभी राहिली मात्र गोपाल गतप्राण झाल्याचे पाहताच ती कोसळली. यामुळे तिला जबर मानसिक धक्का बसला. तिला तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे डाॅक्टरांनी तिला नागपूर येथे हलविण्यास सांगितले. तिला नागपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले. नागपूर येथेच तिचा मृत्यू झाला. 
विशेष म्हणजे गोपाल आणि कुंदा यांनी काही दिवसांपूर्वीच कायदेशिर रित्या विवाह केला होता. लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी दोघांच्याही कुटूंबीयांनी जून महिन्यात अहेरी येथे विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. दोघेही आनंदात विवाहाची तयारी करीत असतानाच अचानक त्यांच्यावर काळाने झडप घातली. यामुळे दोघांच्याही कुटूंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज १४ मे रोजी सायंकाळी ४  वाजता अहेरी येथे  अंत्यसंस्कार केले जाणार आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-14


Related Photos