भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात बदल करण्याचा संरक्षण खात्याचा विचार


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  भारतीय सैन्यदलाच्या  नवीन गणवेशासाठी संरक्षण खात्याने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून सूचना मागवल्या आहेत.  भारतीय सैन्यदलाचा गणवेश अधिक कम्फरटेबल आणि सुंदर करण्याचा विचार संरक्षण खातं करतं आहे. नवीन गणवेशाबद्दल वेगवेगळ्या सूचना संरक्षण खात्याला मिळत आहे. जगातील इतर देशांच्या सैन्याचे गणवेशही विचारात घेतले जात आहेत. 
भारतीय सैन्यातील जवानाकडे चार प्रकारचे गणवेश असतात. युद्धभूमीवरील गणवेश(कॉम्बॅट), शांततेच्या काळातील गणवेश(पीस टाइम), जेवतानाचा युनिफॉर्म (मेस) आणि विशेष कार्यक्रमांचा गणवेश (सेरिमोनियल) असे हे चार प्रकार आहेत. हे चारही प्रकारचे गणवेश बदलले जाण्याची शक्यता आहे. 
अमेरिका आणि इंग्लंडच्या गणवेशांमध्ये पुरस्कारांचे बिल्ले भारतीय सैन्याप्रमाणे खांद्यावर नाही तर छातीवर लावले जातात. नव्या गणवेशात असे काही करता येईल का याचा विचार केला जातो आहे. तसंच नवीन गणवेशात शर्ट आणि पॅन्ट दोन वेगळ्या रंगांच्या घेता येतील का हेही विचारात घेतलं जातं आहे. युद्धभूमीवरील गणवेशातील पट्ट्याची रुंदी वाढवण्यात यावी अशीही एक सूचना करण्यात आली आहे. 
दरम्यान सैन्यदलाचा गणवेश बदलणं ही काही एका दिवसांत घडणारी गोष्ट नसून वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. यामध्ये अनेक स्तरांवर चर्चा होऊन मगच नवीन गणवेशाचे डिझाइन निश्चित करण्यात येईल अशी माहिती सेनेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. याआधीही भारतीय सैन्याच्या गणवेशात छोटे-छोटे बदल करण्यात आले आहेत. पण गणवेशामध्ये आमुलाग्र बदल करण्याचा पहिल्यांदाच विचार करण्यात येतो आहे. 

   Print


News - World | Posted : 2019-05-14


Related Photos