इंडिगो मध्ये नोकरीचे अमिष दाखवून एनईएसएलच्या संचालकाच्या मुलाची फसवणूक


प्रतिनिधी / नागपूर :  इंडिगो एअरलाइन्समध्ये मनुष्यबळ विकास अधिकाऱ्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महापालिकेच्या एनईएसएलचे (नागपूर इन्व्हॉयर्नमेंटल सर्व्हिस लिमिटेड) संचालक शशिकांत हस्तक यांचा मुलगा अमोल शशिकांत हस्तक (२४)  रा. रामकृष्णनगर, खामला याची फसवणूक करण्यात आली.
शशिकांत हे महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे निवृत्त मुख्य अभियंतेही आहेत, असे पोलिसांनी सांगितले. अमोलच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी दोन तरुणींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नेहा सिंग व श्वेता अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणींची नावे आहेत. अमोल हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. १० मे रोजी श्वेताने अमोलच्या मोबाइलवर संपर्क साधला. फ्युचर जॉब सॉल्युशनची प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून तिने त्याला नोकरीचे आमिष दाखविले. त्यानंतर नेहाने त्याला इंडिगोमध्ये मनुष्यबळ विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून या पदावर नोकरी लावून देण्याचे सांगितले. दोघींनी त्याला विविध बँक खात्यांमध्ये ५० हजार ९०० रुपये जमा करण्यास सांगितले. अमोलने पैसे जमा केले. परंतु त्याला नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमोलने प्रतापनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक शिवचरण पेठे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.  Print


News - Nagpur | Posted : 2019-05-13


Related Photos