ब्रेक समजून एक्सलेटरवर पाय दिला, नवशिक्या चालकामुळे एकाचा बळी गेला


- आरमोरी येथील घटना, ७  जण जखमी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
लग्नसमारंभासाठी भाड्याने घेतलेले महिंद्रा झायलो वाहन चालविता येत नसतानाही मालकाकडून चावी मागून घेतली. यानंतर वाहनात बसून वाहन सुरू केले. मात्र ब्रेक समजून एक्सलेटरवर पाय दिल्याने वाहन भरधाव वेगाने   समोरील व्यक्तींच्या  अंगावर गेले. या अपघातात नाहक एकाचा बळी गेला आहे तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना आज १२ मे रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास आरमोरी येथील दत्त मंदिराजवळ घडली आहे.
प्रदिप सुधाकर सेलोकर (३८)  रा. आरमोरी असे या अपघातात जागीच ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात लक्ष्मी गोमाजी मेश्राम (८३) रा. आरमोरी, विद्या प्रदिप सेलोकर (४०)  रा. खारोटी मोहल्ला आरमोरी, अभिनव प्रदिप सेलोकर (५) , राजु किसन कानतोडे (५०) रा. आरमोरी बर्डी, वर्षा गोपिनाथ ठवकर (४०) रा. भंडारा, अनिशा अनिल बाभरे (२८) रा. भाकरोंडी व मंगला हणुमंत फळके (४०) रा. आरमोरी हे जखमी झाले आहेत. जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 
घटनेतील आरोपी नितीन रेवनदास निंबाते (२२) रा. पळसगाव  याला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार नितीन निंबाते याच्या मावसभावाचे लग्न होते. लग्नसमारंभासाठी एमएच ३३ एएम २७३९ क्रमांकाचे झायलो वाहन भाड्याने घेतले होते. वाहन सजावट करायची असल्याचे सांगून नितीन याने वाहन मालक राजु सोनकुसरे यांच्याकडून चावी मागितली. मात्र त्याने सजावट न करता वाहन चालविता येत नसतानाही चावी लावून सुरू केले . यावेळी त्याने एक्सलेटरवर पाय देताच वाहन समोरील व्यक्तींच्या अंगावर गेले. यामध्ये प्रदिप सेलोकर यांचा जागीच मृत्यू झाला. 
घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरोपी नितीन निंबाते याच्यावर भादंवि २७९ , ३०४ (अ) , ३३७ , ३३८ , ४२७, सहकलम १३४, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अनंत राठोड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक महारूद्र परजने करीत आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-12


Related Photos