‘लादेन किलर’ अपाचे हेलिकॉप्टर हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन :
शत्रूला धडकी भरविणारे अमेरिकेचे अत्याधुनिक ‘ए-६४५’ हे अपाचे हेलिकॉप्टर हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. अमेरिकेने ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी या लढाऊ अपाचे हेलिकॉप्टरचा वापर केला होता. तेव्हापासून ‘लादेन किलर’ अशी या हेलिकॉप्टरची ओळख आहे. दरम्यान, हिंदुस्थानी हवाई दलाकडून पाकिस्तान आणि चीन सीमेवर हे हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहे.अमेरिकेतील ऑरिझोना राज्यातील मेसा शहरातील अपाचे निर्मिती कारखान्यात आज हस्तांतरण कार्यक्रम झाला. यावेळी हिंदुस्थानचे एअर मार्शल ए. एस. बुटोला हे उपस्थित होते. पहिले अपाचे हेलिकॉप्टर हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे.
हिंदुस्थानी हवाई दलात रशियाकडून घेतलेली मिग हेलिकॉप्टर्स आहेत, मात्र ही हेलिकॉप्टर्स जुनी झाली आहेत. त्यामुळे नवीन हेलिकॉप्टर्सची गरज होती. अमेरिकेकडून २२ अपाचे हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार सप्टेंबर २०१५ मध्ये करण्यात आला. १३,९५२ कोटींचा हा करार आहे. मार्च २०२० पर्यंत २२ हेलिकॉप्टर्स हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील. ५१६५ किलो वजनाच्या हेलिकॉप्टरचा ताशी वेग ३६५ कि.मी. आहे. डोंगराळ, दऱयाखोऱयांच्या प्रदेशात, उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात शत्रूच्या ठिकाणांवर अचूक वेध घेण्याची क्षमता आहे. शत्रूच्या हद्दीत घुसून रणगाडे उद्ध्वस्त करण्याची ताकद या हेलिकॉप्टरमध्ये आहे. १९७५ मध्ये अमेरिकेने अपाचे हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली. १९८६ ला पहिल्यांदा युद्धभूमीवर वापर करण्यात आला. अफगाणिस्तान युद्धात वापरण्यात आले. अमेरिकेसह नेदरलँड, इजिप्त, इस्रायलकडे ही हेलिकॉप्टर्स आहेत.  Print


News - World | Posted : 2019-05-12


Related Photos