दारूबंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात विक्री करण्यासाठी सुरू असलेल्या बनावट दारूनिर्मितीच्या कारखान्यावर धाड


- पोलिसांनी केली तिघांना अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
गोटाळ पांजरातील कस्तुरीनगर येथील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट दारूनिर्मितीच्या कारखान्यावर बेलतरोडी पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली आहे. या कारखान्यात  व्हिस्कीत कॉफीचे पावडर व अन्य साहित्य टाकून ही व्हिस्की इम्पेरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग व अन्य महागड्या विदेशी दारूच्या बाटलीत भरण्यात येत होती. या भेसळयुक्त दारूची बंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर येथे विक्री करण्यात येत होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे.  या फ्लॅटमधून पोलिसांनी रिकाम्या बाटल्या, मध्यप्रदेशातून आणलेली दारु, खरडे, मोटरसायकल, मोबाइलसह सुमारे चार लाख ४२ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. 
पवन गोवर्धनदास जुमनानी (२२)   रा. राजनांदगाव , अजय अनिंद्र भालाधरे (२२)  रा. गोंदिया  व अंजार हक ऊर्फ समीर वाहिदुल हक (२६) लोधीपुरा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पवन याने काही दिवसांपूर्वी कस्तुरीनगर येथील लतासिंग बैस यांचा फ्लॅट भाड्याने घेतला. अन्य दोन साथीदारांच्या मदतीने तो मध्यप्रदेशातून बॉम्बे स्पेशल व्हिस्की नागपुरात आणायचा. फ्लॅटमध्ये या व्हिस्कीत कॉफीचे पावडर व अन्य साहित्य टाकून ही व्हिस्की इम्पेरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग व अन्य महागड्या विदेशी दारूच्या बाटलीत भरण्यात येत होती. या भेसळयुक्त दारूची बंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर येथे विक्री करण्यात येत होती. या दारूनिर्मितीच्या कारखान्याबाबत बेलतरोडी पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक पोलिस आयुक्त अ. ग. सरंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय तलावारे, निरीक्षक दिलीप साळुंखे, हेडकॉन्स्टेबल अविनाश ठाकरे, शिपाई विजय श्रीवास, गोपाल देशमुख, रितेश ढेंगे, सुरेंद्र पगारे, मिलिंद पटले, नितीन, प्रशांत, कुणाल लोकश व राजेंद्र यांनी फ्लॅटमध्ये छापा टाकला. तिघांना अटक केली.  तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-05-12


Related Photos