जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक ; २ दहशतवाद्यांना कंठस्नान


वृत्तसंस्था / श्रीनगर :  जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. शोपियान जिल्ह्यातील हिंदसीतापूर भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. लष्करी जवानांनी या परिसराला वेढा मारून शोधमोहीम हाती घेतली. त्यानंतर झालेल्या चकमकीत हे दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कर अधिकाऱ्याने दिली. 
परिसरात शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. जवानांच्या गोळीबारात लपलेले दोन दहशतवादी ठार झाले. चकमक स्थळावरून शस्त्र आणि अन्य स्फोटक साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याआधी शुक्रवारी सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. त्याच्याकडेही मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळाला होता. हा दहशतवादी इश्फाक अहमद आहे, अशी माहिती जम्मू - काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली होती. हा दहशतवादी 'तारिक अल मुजाहिद्दीन'चा होता. त्याला अटक करण्यात आली होती परंतु, काही दिवसांपूर्वीच तो बाहेर आला होता.  बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या एयर स्ट्राइकनंतर ४५ दहशतवादी भारतीय हद्दीत घुसल्याची शंका आहे. यात 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.   Print


News - World | Posted : 2019-05-12


Related Photos