विवाह सोहळ्यातून सामाजिक आदर्श, खुशाल-पूजा यांचा विवाह सोहळा थाटात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा : 
दोन मनांना एकत्रित गुंफणारा धागा म्हणजे विवाह. सध्या लग्नसराई जोरात असून वेळेवर न लागणारे लग्न आणि उन्हाचा तडाखा यातून पाहुणे मंडळी यांची चांगलीचं फजिती होताना दिसते. या साऱ्याचा परिपाक म्हणजे लग्न सोहळा म्हटलं की,"नको, रे बाबा..." हे शब्द कानावर येतात. तरी, आप्तस्वकीयांचे लग्न टाळता येत नाही. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र खुशाल आडवे व पूजा रासेकर यांचा नुकताच विवाह सोहळा पार पडला आणि यातून त्यांनी नवा सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.
विवाह सोहळ्याच्या सुरवातीला आजी-आजोबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले आणि विशेष बाब म्हणजे तांदळाची नासाडी होऊ नये म्हणून लग्नात अक्षता न वापरता 'फुल' वापरण्यात आले. माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाल्याने विवाह सोहळ्यावर अनाठायी खर्च न करता, त्यातून समाजपयोगी काम करायचे ठरविले, अशे खुशाल पंचफुला गणपत आडवे यांनी सांगितले. 
या विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याने जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय राजुरा यांना पाच हजार रुपये मदत म्हणून दिले. आपल्या वैवाहिक जीवनाची सुरवात मानोली (बु.) येथे झाडे लावत केली. तर गावातील अंगणवाडीला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून दिली. कुठलाही अनाठायी खर्च नाही, वेळेवर, अगदी साधेपणात विवाह आणि तितक्याच सामाजिक जाणीवा प्रगल्भ ठेवत विवाहाचा आनंद या दाम्पत्यानी व्यक्त करीत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. या संपूर्ण विवाह सोहळ्यात शिक्षक संभाजी साळवे, कवी राजू भोयर, कवी आदित्य आवारी, देवानंद भांडारकर व अडवे-रासेकर कुटुंबीयांचे विशेष सहकार्य लाभले.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-12


Related Photos