व्याघ्रपर्यटनात ताडोबा-अंधारी प्रकल्प अव्वल


- पर्यटकसंख्या सुमारे पावणेदोन लाखांवर 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
व्याघ्रदर्शनासाठी येणाऱ्या ताडोबा-अंधारी प्रकल्पातील पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही वाढ नोंदविण्यात आली आहे. २०१८-१९ या वर्षात ताडोब्यातील पर्यटकसंख्या सुमारे पावणेदोन लाखांवर पोहचली आहे. परिणामी व्याघ्रपर्यटनात राज्यात पुन्हा एकदा ताडोबा अव्वल ठरले आहे. 
जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या तसेच घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. ताडोबा हे पानझडीचे वन आहे. वाघ बिबट्यांशिवाय या उद्यानात आढळणाऱ्या मगरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. परिणामी या व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. २०११-१२ या आर्थिक वर्षात ताडोब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. पर्यटकांचा आकडा साडेसत्तेचाळीस हजारांवर पोहचला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने येथे वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे पावणेदोन लाखांहून अधिक पर्यटकांनी येथे लावली आहे. 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व वन विभागाने 'इको टुरिझम' ला चालना दिल्याने तसेच ताडोबा व्यवस्थापनानेही पर्यटनवाढीसाठी पुढाकार घेतल्याने मागील काही वर्षात पर्यटकांच्या संख्येतील वाढ दिसून आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कोअरसोबतच बफर झोनमध्येही सफारीसाठी पर्यटकांचा कल दिसून आला आहे. यंदा पर्यटकांसोबतच आजवरची सर्वात मोठी महसूल प्राप्ती झाली आहे. यंदा सुमारे १० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याचे ताडोबा व्यवस्थापनाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. हा आजवरचा सर्वात मोठा आकडा ठरला आहे. यंदा बफर झोनचे गेटदेखील वाढविण्यात आले असून ती संख्या दहावर पोहोचली आहे. 
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कंबर कसली. यासाठी खास 'फॅम टूर' चे आयोजनदेखील करण्यात आले होते. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 'ट्रॅव्हल्स एजन्ट्स' व 'टूर ऑपरेटर्स'नी सहभाग घेतला . त्याचे सकारात्मक परिणाम दिसल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे. 
कधी किती पर्यटक? 
२०१२-१३ - ८६ हजार ५५७ 

२०१३-१४ - १ लाख ५ हजार ८४४ 

२०१४-१५ - १ लाख ११ हजार ६०८ 

२०१५-१६ - १ लाख ३१ हजार ८६९ 

२०१६-१७ - १ लाख ४० हजार २९४ 

२०१७-१८ - १ लाख ७२ हजार ९०४ 

२०१८-१९ - सुमारे १ लाख ७५ हजार   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-11


Related Photos