वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाची शानदार सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई : 
शास्त्रीय संगीतातील रत्न म्हणून ख्याती असलेले डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने रवींद्र नाट्यगृहात मोठ्या उत्साहात झाली. हा सोहळा त्यांचे लाडके शिष्य व संगीत सभेचे प्रमुख विश्वस्त पं. चंद्रकांत लिमये व दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय) भारत सरकार यांच्या संयोजनाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी अच्युत गोडबोले, पं. शंकर अभ्यंकर, श्रीमती फैयाज, राजू हळदणकर, रवींद्र आवटी, निलय वैद्य, सुरेश महाजन, सुरेश खरे आणि दिपक कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात ग्वालेर घराण्याच्या नुपूर गाडगीळ यांनी राग भीपालासीने केली. त्यानंतर डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावरील लेख, दुर्मिळ फोटो, त्यांचे पत्र समाविष्ट असलेल्या "नक्षत्र वसंत" स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मान्यवरांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांची गायकी, विनोद बुद्दी, संगीतातली वैविध्य, हरहुन्नरीपणा आदी यांच्या आठवणीना उजाळा दिला.
यावेळी पं. चंद्रकांत लिमये म्हणाले, “कलागुणांना योग्यवेळी योग्य व्यासपीठ मिळाले तर त्यांना पुढे येण्यासाठी वेळ लागत नाही याकरीता मी आजवर अनेक होतकरू, होनहार कलाकारांना मी माझ्या संस्थेच्या रंगमंचावरून संधी दिली आहे व यापुढेही देण्याचा प्रयत्न करीत राहीन. "कट्यार' मध्ये खांँसाहेबांच्या तोंडी एक वाक्य आहे की,"आमच्या नंतरही आमची गायकी (गादी) पुढे चालू रहावी ही आमची दुसरी मुराद आहे".  आणि ती प्रत्यक्ष जीवनात डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या नंतर मी त्याच नाटकात खांँसाहेबांची भूमिका करून सिद्ध केलेली आहे आणि गायकीच्या बाबतीत त्यांची गायकी पुढे नेण्याचं काम मी माझ्या शिष्यांना शिकवून पूर्ण करीत आहे". तसेच त्यांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांचा आजवरचा संगीत प्रवास यावर डॉक्युमेन्ट्ररी बनविण्याचा मानस व्यक्त केला.
यानंतर वसंत बहार' हा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम पं. चंद्रकांत लिमये यांनी आपल्या गुरुकुलातील शिष्यांसह सादर केला.  या कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदीशी, ठुमरी, नाट्यगीत, आदी सादर केली यात पं.चंद्रकांत लिमये यांचे शिष्य कैवल्य केजकर यांनी "कट्यार काळजात घुसली” या नाटकातील "सुरत पियाकी" या नाट्यगीताने प्रेक्षकांची दाद मिळवली.  
डॉ. वसंतराव देशपांडे हे अतिशय बुद्दिमान, रसिले व नाविन्याचा शोध घेणारे होते या शब्दांत संगीत विदुषी गायिका प्रभा अत्रे यांनी वर्णन केले.  कार्यक्रमाची सांगता संगीत विदुषी गायिका प्रभा अत्रे यांच्या जोगकंस, तराना व राग भैरवी ने प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केले.    Print


News - Rajy | Posted : 2019-05-11


Related Photos