तुळजाभवानीच्या खजिन्यावर दरोडा, मौल्यवान अलंकार, प्राचीन नाणी, वस्तू गायब


वृत्तसंस्था  /  धाराशीव (उस्मानाबाद) :  महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातून कित्येक मौल्यवान अलंकार, प्राचीन नाणी, वस्तू गायब असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मंदिराच्या दफ्तरात नोंद असलेले दागदागिने नोंदवहीतून गायब करण्यात आले आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा  दाखल करण्याची मागणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे व ॲड. शिरीष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बिकानेरा, औरंगजेब, डॉलर, चित्रकूट उदयपूर संस्थान, ज्यूलस, शहाआलम इसरा, बिबाशुरूक, फुलदार, दारूल खलिफा, फत्ते हैदराबाद, आलमगीर, दोन आणे, इंदोर स्टेट सूर्याछाप, अर्कोट, फरोकाबाद, शहाजहान  अशी प्राचीन नाणी लंपास करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच खजिन्यात दुर्मिळ ७१ नाणी होती. १९८० पासून या नाण्यांची नोंद मंदिराच्या नोंदवहीत आहे, मात्र पदभार देताना ही ७१ नाणी गायब झाल्याचे आढळले. या नाण्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत शेकडो कोटींच्या घरात आहे.
  मंदिराच्या नोंदवहीत मंदिराला मिळालेल्या दानाची रीतसर नोंद केली जाते. १९८० पर्यंत तुळजाभवानीच्या खजिन्याची जबाबदारी अंबादास भोसले यांच्याकडे होती. भोसले यांनी हा सर्व खजिना महादेव दीक्षित यांच्याकडे सुपूर्द केला. नोव्हेंबर २००२ मध्ये महादेव दीक्षित यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर खजिन्याची जबाबदारी दिलीप नाईकवाडी यांनी स्वतःकडे घेतली. तेव्हापासून खजिन्याचा ताबा नाईकवाडी यांच्याकडेच आहे. दीक्षित यांच्या निधनानंतर २००५ पर्यंत नाईकवाडी यांनी खजिना हाताळला. त्यानंतर २००५ मध्ये या खजिन्याची मंदिराच्या नोंदवहीत रीतसर नोंद घेण्यात आली.
२००५  मध्ये मंदिराच्या नोंदवहीत नोंदवण्यात आलेले अनेक दागिने १४ वर्षांनंतर गायब झाल्याचे आढळले. माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड झाली आहे. दीक्षित यांच्या निधनानंतर सलग तीन वर्षे खजिन्याच्या चाव्या दिलीप नाईकवाडी यांच्याकडे होत्या. या कालावधीत खजिन्यातील वस्तू गायब झाल्याची शंका व्यक्त होत आहे. नाईकवाडी निवृत्त झाल्यानंतर लेखापाल सिद्धेश्वर इंदोले यांच्याकडे हा पदभार आला.
महादेव दीक्षित यांचा मृत्यू ते पंचनामा या कालावधीत दिलीप नाईकवाडी यांनी खजिना हाताळला. त्यापूर्वीच्या काही तफावती असल्यास आपण त्यास जबाबदार नाही असे इंदोले यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे पदभार देताना मौल्यवान दागिने ठेवण्यात आलेल्या पेट्या उघड्याच होत्या. अनेक पेट्यांच्या किल्ल्या हरवल्याचे यावेळी समोर आले तर काही पेट्यांचे कुलूप तोडून चीजवस्तूंची पाहणी करण्यात आली.   Print


News - Rajy | Posted : 2019-05-11


Related Photos