देसाईगंज येथील तिरूपती राईस मिलमधून शासकीय तांदळाची अफरातफर, धडक कारवाईत तहसीलदारांनी केले दोन ट्रक जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  देसाईगंज : 
येथील तिरुपती राईसमिलमध्ये दुस-या राईसमिलचे लेबल लावून आदिवासी विकास महामंडळातर्फे  भरडाईस देण्यात आलेल्या तांदळाची मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून शासनाला कोट्यावधीने लुटल्या जात असल्याची गंभीर तक्रार प्राप्त होताच देसाईगंजच्या तहसीलदारांनी धाड टाकुन तांदुळ नेणारे दोन्ही ट्रक जप्त केल्याची घटना काल ९ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे राईसमिल संचालकात खळबळ माजली आहे. 
तिरूपती राईसमिलला भरडाईसाठी देण्यात आलेला तांदुळ लक्ष्मी राईसमिलच्या नावाने शासनाकडे जमा करून शासनाची कोट्यावधी रूपयांनी फसवणूक केल्या जात असल्याची तक्रार आविसचे सरसेनापती नंदु नरोटे यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांकडे केली होती. दरम्यान देसाईगंज येथील नैनपुर मार्गावरील तिरुपती राईसमिलमध्ये संबंधित  अधिकाऱ्यांनी  तक्रारदार व येथील स्थानिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीसमक्ष धाड टाकुन मोका चौकशी केली.चौकशी दरम्यान सदर राईसमिल मध्ये धान भरडाई केल्यानंतर दुसऱ्या लेबल असलेल्या कट्यात तांदळाची पॅकिंग करून ट्रक क्रमांक एमएच-३१ सीक्यू ९०६८ मध्ये  ५४० व एमएच ३४ बी २७७५ मध्ये ५० किलो वजनाचे  प्रत्येकी  जवळपास १३० कट्टे भरल्या जात असल्याचे आढळून आले. ही बाब बेकायदेशीर असल्याने व संबंधित मिल संचालकाने उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने सदर दोन्ही ट्रकचा जप्ती पंचनामा तयार करून ट्रक ताब्यात घेण्यात आले. हे दोन्ही ट्रक देसाईगंज पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. 

तांदुळ विकला असल्याने पुरवठा केल्या जात होता : अग्रवाल 

तिरुपती राईसमिलचे संचालक कैलास अग्रवाल यांना याबाबत विचारणा केली असता सदरचा तांदूळ लक्ष्मी राईसमिलच्या संचालकास विकला असल्याने त्यांच्या मिलच्या नावाने असलेल्या बारदान्याचा वापर करून पुरवठा केल्या जात असल्याची माहिती त्यांनी  दिली. तथापी या संदर्भात करारनाम्याची प्रत मागण्यात आली असता ते निरुत्तर झाले. 

आपल्या ‘त्या’ प्रकरणाशी काही संबंध नाही : घिसुलाल काबरा

या संदर्भात लक्ष्मी राईसमिल शिवणीचे संचालक घिसुलाल काबरा यांना विचारणा केली असता आदिवासी विकास महामंडळाकडुन भरडाईस देण्यात आलेला धान आपण रितसर आपल्या मिलमध्येच  भरडाई करून नियमानुसार शासन जमा करीत असतो. देसाईगंज येथील तिरुपती राईसमिलमध्ये घडलेल्या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याची माहिती त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-10


Related Photos