महत्वाच्या बातम्या

 वनश्री महाविद्यालयात मिट्टी को नमन वीरोंको वंदन कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : स्थानिक कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयात रासेयो विभागाच्या वतीने मिट्टी को नमन वीरोंको वंदन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात कारगील युद्धात सहभागी माजी सैनिक चतुरसिंग सिंद्राम तसेच कोरची पोलिस स्टेशनचे एपीआय गणेश फुलकवर यांना महाविद्यालयातर्फै वंदन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण भारतभर सुरू असलेला मेरी माटी, मेरा देश या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मनोजभाऊ अग्रवाल हे होते. तर सत्कारमूर्ती म्हणून माजी सैनिक चतुरसिंग सिंद्राम व कोरची पोलिस स्टेशनचे एपीआय गणेश फुलकवर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा प्रदिप चापले, तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी प्राचार्य डॉ व्ही.टी. चहारे, प्रा. आर.एस. रोटके, प्रा. डॉ. एम.डब्ल्यू. रुखमोडे हे उपस्थित होते. 

यावेळी सत्कारमूर्तींना शाल व पुष्पगुच्छ देऊन वंदन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना एपीआय गणेश फुलकवर म्हणाले की, भारतीय सैन्य देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावते. त्यांच्यामुळेच आपण आपल्या घरी निर्धास्त राहू शकतो. आपणाला वेगवेगळे सण उत्सव थाटामाटात साजरे करता यावेत म्हणून भारतीय सैन्य कुटुंबापासून दूर राहून सीमांचे रक्षण करतात. गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस दल व सीआरपीएफ यांचे योगदानही अतिशय अभिमानास्पद आणि अनमोल आहे. म्हणून देशवासीयांनी त्यांच्याप्रती नेहमी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. पुढे बोलतांना ते म्हणाले की, प्रत्येक गरजूंना मदत करणे, अशिक्षित लोकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोचवणे ही सुद्धा खूप मोठी देशसेवाच आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. 

यावेळी माजी सैनिक चतुरसिंग सिंद्राम यांनी मार्गदर्शन करतांना आपल्या २२ वर्षांच्या कारकिर्दीतील अनेक रोमांचित अनुभव कथन केले. कारगील युद्धादरम्यान भारतीय फौजेला रसद पुरवठा करतांना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. दिवसा असलेले पूल एका क्षणात शत्रू सैन्य उद्ध्वस्त करायचे. अशा वेळी अडकून पडल्यावर तीन तीन चार चार दिवस अन्न पाण्याविनाही रहावे लागत असे. मात्र भारतीय सैन्य आणि इंजिनीअर एका रात्रीतून पूल उभे करायचे, अशा अनेक प्रसंगाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. घरापासून दूर राहून अतिशय कठीण प्रशिक्षण पूर्ण करून सैनिक तयार होतात. आपल्या विभागातील विद्यार्थी हे शूरवीर आणि काटक असल्याने ते हे प्रशिक्षण नक्कीच पूर्ण करू शकतात. ज्यांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची आहे त्यांना भरतीबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी आपण नेहमी तयार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रदिप चापले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतीय सैन्य आणि गडचिरोली पोलीस यांच्या अद्वितीय साहसाचे आणि योगदानाचे कौतुक करून त्यांच्या बलिदानानेच हा देश उभा असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. मानवी प्राण्याच्या उत्पतीपासूनचा इतिहास हा नेहमीच संघर्षप्रवण राहिला आहे. आजवर अनेक साम्राज्यवादी शासकांनी जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहिले. परंतु त्यातून फक्त विनाशच घडून आला. खरे तर सर्व मानवांनी संत ज्ञानेश्वरांच्या विश्वबंधुत्वाची संकल्पना स्वीकारली तर लढायची गरजच उरणार नाही. मात्र माणसाची हाव त्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपणालाही दक्ष रहावे लागते, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. भूमातेला नमन करण्यासाठी आपण प्रत्येकाने शस्त्रच हातात घेऊनच लढायची गरज नाही, तर आपल्या भागातील अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, शिक्षण, जल, जंगल, जमीन अशा  अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्याची संधी आपणाला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून मानवी जीवन अधिक सुकर आणि सुखी करण्यासाठी झटण्याचे देशकार्य तरुणांनी करावे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज अग्रवाल यांनीही या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या कुटुंबापासून दूर राहून केवळ देश आणि देशबांधवांच्या सुरक्षेसाठी सीमेवर प्राणाचे बलिदान देणारा सैनिक हा सर्वोच्च आदरस्थानी असतो, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यासोबतच आपल्या परिसरातील विविध समस्यांचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार असले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका कार्यकारी प्राचार्य डॉ व्ही.टी. चहारे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून विशद केली. देशाचे बाह्य आणि आंतरिक शत्रूंपासून रक्षण करणारे सैन्य आणि पोलीसदल हे देशाचे अभिमान आहेत. स्वतःच्या प्राणांची बाजी लावून ते आपले कार्य चोख बजावत असतात. त्यांच्या या गौरवास्पद कार्याला सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जी.टी. देशमुख यांनी केले तर आभार प्रा. डॉ. एम.डब्ल्यू. रुखमोडे यांनी मानले. 

यावेळी घाटघुमर, प्रा. मांडवे, प्रा. दोनाडकर, प्रा. वालदे, प्रा. धिकोडी, प्रा. फुंडे, प्रा. मिसार, प्रा. विनायक, प्रा. बावनथडे, बालक साखरे, प्रकाश मेश्राम व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सत्कारमूर्तींचा सत्कार करतांना विद्यार्थ्यांनी अनेक देशभक्तीपर नारे लावल्याने संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos