महत्वाच्या बातम्या

 आरोग्य सेवेची दर्जेदार व्यवस्था उभारण्यास नेहमीच कटीबद्ध : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार    


- स्वातंत्र्यदिनी मनपा आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पुर्ण केली असतांना शासनाद्वारे विविध आरोग्यदायी योजना यशस्वीपणे राबविल्या जात असुन आरोग्य या मुलभुत सेवेसाठी दर्जेदार व्यवस्था उभारण्यास नेहमीच कटीबद्ध राहणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले.

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दादमहल येथील डॉ. जाकीर हुसेन उर्दु प्राथमिक शाळा येथील मनपा आरोग्यवर्धिनी केंद्राचे उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, आज शासनाद्वारे ग्रामीण तसेच शहरी भागातील आरोग्य सेवा सक्षम केल्या जात आहेत. उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात ७०० ठिकाणी सुरु केले जात आहेत.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात असून या योजनेंतर्गत महात्मा फुले आरोग्य सेवेचे विमा संरक्षण हे दीड लाखांपासून ५ लक्ष पर्यंत वाढविण्यात आले आहे. घराजवळ आरोग्य वर्धिनी केंद्र उपलब्ध होत असल्याने आता कुणालाही आर्थीक परिस्थितीमुळे आजार अंगावर काढण्याची गरज नाही. या आरोग्य विम्याच्या माध्यमातून खाजगी व सरकारी रुग्णालयांच्या सहाय्याने एकूण १ हजार २०९ उपचार व शस्त्रक्रियांवर मोफत सेवा रुग्णास देण्यात येत असुन गरीब व गरजुंना आरोग्य सेवेचा लाभ योग्य प्रकारे दिला जात आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे दादमहल येथील नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र मिळुन एकूण १२ केंद्रे सुरु करण्यात आली आहे. या केंद्रांवर बाह्यरुग्ण सेवा,मोफत औषधोपचार,मोफत तपासणी, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, फोनद्वारे आरोग्य सल्ला देणे इत्यादी आरोग्य सेवा देण्यात येतात.          

या प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल,उपायुक्त अशोक गराटे, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता अनिल घुमडे, विजय बोरीकर, रविंद्र हजारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार,माजी उपमहापौर राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश धारणे, डॉ. आविष्कार खंडारे उपस्थीत होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos