१५ जवानांच्या मृत्यूस कारणीभूत उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा


- शहीद जवान आरिफ तौशिब शेख यांच्या कुटूंबीयांसह वकील संघाची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बिड :
गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा - कोरची मार्गावर जांभुळखेडा नजीक नक्षल्यांनी घडविलेल्या स्फोटात १ मे रोजी १५ जवान शहीद झाले. या घटनेला कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे हे जबाबदार आहेत. यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बिड जिल्ह्यातील पाटोदा येथील शहीद जवान आरिफ तौशिब शेख यांच्या कुटुंबीयांसह तालुका वकील संघाने निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दादापूर येथे नक्षल्यांनी ३० एप्रिल रोजी रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी शैलेश काळे हे दादापूर येथे गेल्यानंतर त्यांनी १५ सैनिकांच्या हद्दीच्या बाहेर असलेल्या दादापूर येथून आल्यानंतर पुन्हा शिघ्रकृती दलाच्या जवानांना पाठविण्यात आले. मात्र जवानांच्या सुरक्षीततेची कोणतीही दक्षता घेण्यात आली नाही. महत्वाचे म्हणजे कोणत्याही परिसरात नक्षल्यांनी असा प्रकार केला तर त्या घटनास्थळी जाण्यापूर्वी परिसरातील २० ते २५ किमी भागात तपासणी केली जाते. मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे हे वरीष्ठ अधिकारी असल्याने त्यांचा आदेश प्राप्त होताच जवानांना पोलिस वाहन नसल्याने खासगी वाहनातून प्रवास करणे भाग पडले.
दादापूर येथे १५ सैनिकांना पाचारणा करण्यापूर्वी बॉम्ब शोध पथक वाहन पुढे असणे गरजेचे होते. हे माहित असतानाही उपविभागीय पोलिस अधिकारी काळे यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून बेकायदेशिरपणे आदेश देउन १५ जवानांना खासगी वाहनाने बोलाविले. यामुळे काळे हेच घटनेला जबाबदार असल्याचे शासनास निदर्शनास आल्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. मात्र शैलेश काळे यांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे व १५ शहीद जवानांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना तालुका वकील संघ पाटोदाचे अध्यक्ष ॲड. जब्बार पठाण, शहीद जवानांचे वडील शेख आरीफ उस्मान भाउ शेख आसिफ आरीफ, भाऊ सय्यद एजाज उस्मान, आई शेख शमीम आरीफ, पत्नी शेख अंजूम तौसिफ, भाऊ शेख नाजीम आरीफ, चुलतभाऊ सय्यद अन्सार उस्मान, सय्यद ताहेर मोहीद्दीन, सय्यत मुयाज मोहीद्दीन आदी उपस्थित होते.

   Print


News - Rajy | Posted : 2019-05-09


Related Photos