महत्वाच्या बातम्या

 जिल्हा क्रीडा संकुलात ४ हजार चौरस फुटाची महारांगोळी


-  १ हजार १०० किलो रांगोळीचा वापर

- रांगोळी प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार

- रांगोळीत महापुरुषांचे चित्र व यशोगाथा

विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने ४ हजार चौरस फुटाची महारांगोळी साकारण्यात येत आहे. रांगोळी साकारण्यासाठी तब्बल १ हजार १०० किलोग्रॅम रांगोळीचा वापर करण्यात येत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त ९ ऑगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यात माझी माती, माझा देश हा उपक्रम उत्साहात साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा क्रीडा संकुल येथे ४ हजार चौरस फुटाची ही महारांगोळी साकारण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस अशा स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या राष्ट्रपुरुषांची यशोगाथा रांगोळीच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकारण्यात येत आहे.

रांगोळीचे हे प्रदर्शन १५ ऑगस्ट पासून सर्व नागरीकास पाहण्यासाठी नि:शुल्क उपलब्ध आहे. ही रांगोळी साकारण्याकरीता १ हजार १०० किलोग्रॅम रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. चोवीस तासांपेक्षा कमी कालावधीत रांगोळी साकारली जात आहे. वर्धा येथील कला शिक्षक व स्थानिक कलाकार आशिष पोहाणे, विशाल जाचक, सुषमा चाळसराफ, करीश्मा जालान, अजय उईके यांच्यासह अन्य कलाकार सहभागी झाले आहे.

या रांगोळी प्रदर्शनाचा वर्धा शहरातील सर्व नागरीकांनी विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अभियानाच्या नोडल अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos