महत्वाच्या बातम्या

 स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून होणार सुटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : भारत सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिना निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त करावयाच्या समारोहाचा भाग म्हणुन विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या समारोहातंर्गत स्वातंत्र्यदिनी राज्यातील कारागृहातून सुटका होणाऱ्या १८६ बंद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन मंगळवारी १५ ऑगस्ट साजरा करण्यात येणार असून ,देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यांमध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी १८६ कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत.

माफी योजनेचा उद्द्येश हा कैद्यांमध्ये शिस्त आणि आचरण निश्चित करणे तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे. केंद्रीय गृह सचिवालयाकडून माफी योजनेची वैशिष्ट्ये आणि माफी योजनेचे निकष विहित केले आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्यातील बंद्यांचे विशेष माफी योजनेसाठी पात्रता तपासण्यासाठी ०९ जून २०२२ च्या शासन निर्णयानुसार अपर मुख्य सचिव(अ . व सु. ), गृह विभाग, मंत्रालय यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या बंद्यांच्या प्रस्तावास राज्यपाल यांची मान्यता घेण्यात आली आहे.

अश्या प्रकारे तीन टप्प्यांमध्ये एकूण ५८१ बंद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्यासंबंधीची कार्यवाही महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६ बंदी, दुसऱ्या टप्प्यामध्ये २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ बंदी, कारागृहातून मुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये १५ ऑगस्ट २०२३ रोजी १८६ बंद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत.

स्वातंत्र्यदिनी मुक्त करण्यात येणाऱ्या बंद्यांमध्ये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वयाची ६० वर्ष पूर्ण केलेले पुरुष बंदी ज्यांनी एकूण शिक्षेच्या ५० टक्के कालावधी पूर्ण केलेले ७ बंदी आहेत. तरुण गुन्हेगार १२ ते २१ वर्षे वयात गुन्हा केला त्यानंतर कोणताही गुन्हा केला नाही व ज्यांनी एकूण शिक्षेच्या ५० टक्के कालावधी पूर्ण केलेले १० बंदी आहेत. निर्धन आणि दीन बंदी ज्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे परंतु दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असलेले २ बंदी. एकूण शिक्षेचा कालावधी पैकी दोन तृतीयांश अथवा ६६ टक्के कालावधी पूर्ण करणारे १६७ बंदी आहेत.

राज्यातील कारागृहनिहाय विशेष माफी मंजूर असलेले बंदी पुढीलप्रमाणे : 

१) येरवडा मध्यवर्ती कारागृह : १६

२) येरवडा खुले कारागृह : १

३) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह : ३४

४) ठाणे मध्यवर्ती कारागृह : १

५) नागपूर मध्यवर्ती कारागृह : २३

६) अमरावती खुले कारागृह : ५

७ )अमरावती मध्यवर्ती कारागृह : १९

८) कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह : ५

९) कोल्हापूर खुले कारागृह : ५

१०) जालना जिल्हा कारागृह : ३

११) पैठण खुले कारागृह : २

१२) औरंगाबाद खुले कारागृह : २

१३) औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह : २४

१४) सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह : १३

१५) मुंबई मध्यवर्ती कारागृह : ७

१६) तळोजा मध्यवर्ती कारागृह : ८

१७) अकोला जिल्हा कारागृह : ६

१८) भंडारा जिल्हा कारागृह : १

१९) चंद्रपूर जिल्हा कारागृह : २

२०) वर्धा जिल्हा कारागृह : २

२१) वर्धा खुले कारागृह : १

२२) वाशीम जिल्हा कारागृह : १

२३) मोर्शी खुले कारागृह : १

२४) गडचिरोली खुले कारागृह : ४





  Print






News - Rajy




Related Photos