ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात छोटी तारा वाघिणीने तोडला छायाचित्रकाराचा कॅमेरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चंद्रपूर :
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात  जंगल सफारी करत असताना छायाचित्रकारांच्या हातातील कॅमेरा अचानक जिप्सीच्या खाली पडला. कॅमेरा उचलण्यापूर्वीच  छोटी तारा या वाघिणीने त्यावर झडप घालून कॅमेरा आणि लेन्स तोडली. 
 सुटीमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची  गर्दी आहे. उन्हाचा पारा ४७.२ ते ४५ सेल्सिअवर पोहचला असल्याने  वाघ व अन्य वन्यजीव पाणवठय़ावर गर्दी करत आहेत. अत्यंत दुर्मिळ असलेला  ब्लॅक पँथर पासून छोटी तारा व तिचे कुटुंबही पर्यटकांना दर्शन देत आहेत. वन्यजीव छायाचित्रकार अरुण रस्तोगी आठवडाभरापासून ताडोबात मुक्कामी असून ते सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळ सफारी करत आहेत. या सफारीत त्यांनी ८ वाघ बघितले आहेत. सोमवारी सकाळी त्यांचा कॅमेरा जिप्सीतून खाली पडला तेव्हा छोटी तारा अवघ्या १० मीटर अंतरावर होती. रस्तोगी कधी कॅमेऱ्याकडे तर कधी वाघिणीकडे बघत होते. दरम्यान, त्याच वेळी ताराने कॅमेऱ्यावर झडप टाकली. वाघीण व तिचे दोन छावे काही वेळ कॅमेरा न्याहाळत होते. त्यानंतर त्यांनी कॅमेरा उचलून नेला आणि खेळत बसले. वाघीण व तिच्या छाव्यांच्या या खेळात कॅमेऱ्याचे एकेक भाग अलग होत गेले. लेन्स पूर्णपणे अलग झाल्या. त्यानंतर दोन्ही लेन्स वाघिणीने तोडून टाकल्या. या प्रकारात रस्तोगी यांचे आर्थिक नुकसान झाले.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-07


Related Photos