सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक आरेखकाला लाचप्रकरणी कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
अडीच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेला सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा येथील सहाय्यक आरेखक विजय मुरारी देशमुख याला न्यायालयाने ३ वर्षे कारावास व  ३ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
तुमसर जवळील खरबी जिल्हा भंडारा येथे नवीन राईसमिल बनविण्याकरीता लागणारे अकृषीक जमीनीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरीता आरोपी  सहाय्यक आरेखक विजय मुरारी  देशमुख यांनी तक्रारदारास  २ हजार ५०० रूपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारली. याबाबत त्यांच्या  विरूध्द भंडारा पोलिस ठाण्यात  कलम ७,१३ (१ (ड), १३(२) ला.प्रकायदा १९८८ अन्वये २४ मार्च २०१४  रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण करून  न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले.  अतिरिक्त सत्र न्यायाधिश सचीन बी. भंन्साली यांच्या न्यायालयात सदर खटला चालविण्यात आला. आज ६ मे रोजी  आरोपी विजय मुरारी देशमुख याला कलम ७ लाप्रका मध्ये ३ वर्षे कारावास व ३  हजार  रुपये दंड, दंड न भरल्यास ३  महिने शिक्षा व कलम १३, (१) (ड), सह कलम १३ (२) लाप्रका अन्वये ३ वर्षे कारावास व  ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास  ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलीस उप अधीक्षक, प्रशांत कोलवाडकर   यांनी पुर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाचे वतीने जिल्हा शासकीय अभियोक्ता विश्वास तवले यांनी काम पाहिले व त्यांना  पोलिस उपअधीक्षक महेश चाटे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी,  पो.हवा. रविंद्र गभने, पो. शि. संदिप पडोळे यांनी सहकार्य केले.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-05-06


Related Photos